स्थानिक उद्योजक आणि महिला बचत गटांना मिळणार हक्काची बाजारपेठ-
स्थानिक उद्योजकांना आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत - AMRUT) अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या 'अमृतपेठ थेट बाजारपेठे'चा भव्य उद्घाटन सोहळा आज, २० जुलै २०२६ रोजी नंदुरबार येथे अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात भारत माता प्रतिमेचे पूजनाने झाली.
या महत्त्वपूर्ण बाजारपेठेचे उद्घाटन धर्म जागरण जिल्हा प्रचारक प्रमुख संजयजी वालतुरे (संभाजीनगर) , नागनाथ जोशी राजपूत समाज महिला प्रमुख सौ.दीपाली राजपूत आणि ब्राह्मण पंच अध्यक्ष पंकज पाठक यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थेट बाजारपेठेमुळे नाविन्यपूर्ण संधी
'अमृत' संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवरील छोट्या उद्योजकांना आणि महिला बचत गटांना थेट ग्राहकांशी जोडण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. यामुळे उत्पादकांना त्यांच्या मालाचा योग्य भाव मिळेल आणि ग्राहकांनाही दर्जेदार वस्तू वाजवी दरात उपलब्ध होतील.
"स्थानिक उद्योजक आणि महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे ही काळाची गरज आहे. 'अमृतपेठ'च्या माध्यमातून मिळालेली ही थेट बाजारपेठ नंदुरबारमधील छोट्या व्यवसायांना आणि बचत गटांना नवी उभारी देईल." अशी आशा संजयजी यांनी व्यक्त केली.
नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उद्घाटन सोहळ्यानंतर बाजारपेठेतील विविध स्टॉल्सना नागरिकांनी भेट दिली. स्थानिक पातळीवर तयार होणाऱ्या वस्तू, हस्तकला आणि खाद्यपदार्थांची मोठी रेलचेल या बाजारपेठेत पाहायला मिळत आहे. या उपक्रमामुळे नंदुरबारमधील स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment