महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने गोंदिया येथे आयोजित "अमृत पेठ – थेट बाजारपेठ" या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गोंदिया, : महाराष्ट्र संशोधन उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने आयोजित "अमृत पेठ – थेट बाजारपेठ" या अभिनव उपक्रमाने गोंदियातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. लोकल फॉर व्होकल, स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन, पर्यावरण संवर्धन आणि नवउद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भेट दिली.
प्रदर्शनात ३० विविध स्टॉल्स, स्वदेशी उत्पादने, महिला उद्योजकांचे उद्योग, तसेच पर्यावरण मित्र निसर्ग फाउंडेशन यांच्या वृक्षलागवड व पर्यावरण जनजागृती स्टॉलने विशेष आकर्षण ठरले. लोकल फॉर व्होकल, स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन आणि स्थानिक उद्योजकांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला.
स्थानिक महिला उद्योजक, स्वयंरोजगार करणारे युवक, हस्तकला, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ, स्वदेशी वस्तू, कृषीपूरक उत्पादने तसेच विविध नाविन्यपूर्ण उद्योगांचे प्रदर्शन हे या बाजारपेठेचे प्रमुख आकर्षण ठरले.
पर्यावरण मित्र निसर्ग फाउंडेशन यांच्या स्टॉलवर वृक्षलागवड, पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन आणि हरित जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
यावेळी नागपूर विभागीय व्यवस्थापक श्री. देवदत्त पंडित, अमरावती विभागीय व्यवस्थापक तथा अमृत पेठ – थेट बाजारपेठ राज्य समन्वयक श्री. प्रवीण कोडेश्वर, गोंदिया जिल्हा व्यवस्थापक श्री. कार्तिक तिवारी, सौ. दीप्ती मिश्रा, श्री. जयंत शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
श्री. देवदत्त पंडित यांनी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल (Open Category EWS) युवकांना आवाहन करताना सांगितले की, "आता युवकांनी केवळ नोकरीचा विचार न करता उद्योग व व्यवसाय उभारण्याचा निर्धार करावा. अमृतच्या माध्यमातून नोकरीची मानसिकता बदलून उद्योजकतेची नवी क्रांती घडविण्यात येईल. पंच परिवर्तनाच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक परिवर्तन घडविण्याचे कार्य अमृत करीत आहे."
जिल्हा प्रवक्ता श्री. जयंत शुक्ला यांनी सांगितले की, "येणाऱ्या पाच वर्षांत अमृतच्या माध्यमातून उद्योगविश्वात मोठी क्रांती घडेल. नवउद्योजकता, नवोन्मेष आणि स्वावलंबनाला चालना देणारी शासनाची स्वायत्त संस्था म्हणून अमृत राज्यभर कार्यरत आहे."
प्रदर्शनातील 'अमृत वर्ग' माहिती केंद्र हे विशेष आकर्षण ठरले. येथे अमृतच्या विविध कौशल्य विकास, उद्योजकता, रोजगार, प्रशिक्षण, आर्थिक सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात आली. अनेक युवक-युवतींनी विविध योजनांसाठी नोंदणी करून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्धार व्यक्त केला.
"अमृत पेठ – थेट बाजारपेठ" हा उपक्रम स्थानिक उत्पादक, स्वदेशी उद्योग, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि लोकल फॉर व्होकल या संकल्पनेला बळ देणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला असून, गोंदिया जिल्ह्यात उद्योजकतेची नवी चळवळ निर्माण करण्याची क्षमता या उपक्रमात असल्याचे उपस्थित मान्यवरांनी मत व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment