खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल युवक-युवतींना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यात येत आहे.
हिंगोली: खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील युवक-युवतींना स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत) यांनी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे उद्योगासाठी घेतलेल्या बँक कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी होणार असून, नवउद्योजकांना उद्योग उभारणीसाठी महत्त्वपूर्ण दिलासा मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत उद्योगासाठी १५ लाख रुपयांपर्यंत घेतलेल्या कर्जावरील कमाल १२ टक्के व्याज परतावा अमृत संस्थेकडून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाणार आहे. तथापि, बँकेकडून आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क, सेवा शुल्क किंवा इतर कोणतेही शुल्क या योजनेअंतर्गत देय राहणार नाही.
अर्जदाराने उद्योग किंवा व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत, सहकारी, जिल्हा मध्यवर्ती, शेड्यूल अथवा खासगी बँकेकडून कर्ज घेतलेले असणे आवश्यक आहे. बँकेने निश्चित केलेले सर्व हप्ते नियमित व वेळेत भरल्यासच व्याज परताव्याचा लाभ मिळणार आहे.
अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर शासकीय महामंडळांचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध स्वयंरोजगार व उद्योजकता योजना राबविते. वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना या योजनांचा लाभ घेता येतो.
योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र, अधिवास (डोमिसाईल) प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्रे, उद्योगाचा प्रकल्प अहवाल, उद्यम नोंदणी (असल्यास), आधारशी संलग्न बँक खाते तसेच आवश्यक इतर कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्जदार कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
अमृत संस्थेच्या स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोलीप्रशासकीय इमारत, तळमजला, हिंगोली – ४३१५१३.संपर्क : ७३९१०६५४७१ पात्र युवक-युवतींनी या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग सुरू करावा व स्वावलंबी व्हावे, असे आवाहन अमृत, हिंगोली जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment