स्थानिक उद्योजकांना मिळाले हक्काचे व्यासपीठ; विक्रीसह नव्या व्यावसायिक संधींची दारे खुली
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत - AMRUT) अंतर्गत आयोजित करण्यात आलेला 'अमृतपेठ थेट बाजारपेठ' हा महत्त्वपूर्ण दोन दिवसीय उद्योजकता महोत्सव धुळे येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. अमृत पेठ थेट बाजारपेठेत दोन दिवसांत लाखोंची उलाढाल झाली.
या महोत्सवात जिल्ह्यातील महिला उद्योजिका, नवउद्योजक, कारागीर तसेच विविध लघुउद्योगांनी सहभाग घेत आपल्या उत्पादनांचे आकर्षक स्टॉल उभारले. हस्तकला, गृहउपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, वस्त्र, सौंदर्यप्रसाधने, कृषीपूरक उत्पादने आणि स्थानिक उत्पादनांनी प्रदर्शनात विशेष आकर्षण निर्माण केले. धुळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्थानिक उद्योजकांकडून थेट खरेदी केली.
या उपक्रमामुळे उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रभावी सादरीकरण करण्याची, नवीन ग्राहकांशी संपर्क प्रस्थापित करण्याची तसेच व्यवसाय विस्ताराच्या संधी निर्माण करण्याची संधी मिळाली. ग्राहकांनाही दर्जेदार व स्थानिक उत्पादने थेट उत्पादकांकडून उपलब्ध झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये संपूर्ण अमृत टीम, सहभागी स्टॉलधारक आणि नागरिकांचे मोलाचे योगदान लाभले. संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण असून, ‘व्होकल फॉर लोकल’ आणि स्वावलंबी उद्योजकतेचा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे पोहोचला.
मान्यवरांचे मनोगत
श्री. प्रथमेश कुलकर्णी, विभागीय व्यवस्थापक, अमृत, नाशिक :
"अमृत पेठ ही केवळ विक्रीची बाजारपेठ नसून, स्थानिक उद्योजकांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे व्यासपीठ आहे. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण व शहरी भागातील उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळते."
श्री. हेमंत पाठक, जिल्हा व्यवस्थापक, अमृत, धुळे :
"धुळेकर नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा या उपक्रमाच्या यशाचा खरा आधार आहे. सहभागी प्रत्येक उद्योजकाने आपल्या उत्पादनांची उत्कृष्ट मांडणी केली. भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे अधिकाधिक उद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील."
सहभागी उद्योजकांचे मत :
"अमृत पेठमुळे आम्हाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची, आमची उत्पादने सादर करण्याची आणि नवीन ग्राहक जोडण्याची उत्तम संधी मिळाली. अशा उपक्रमांमुळे छोट्या उद्योजकांचा आत्मविश्वास वाढतो."
नागरिकांची प्रतिक्रिया :
"एकाच ठिकाणी विविध स्थानिक उत्पादने पाहण्याची आणि थेट उत्पादकांकडून खरेदी करण्याची संधी मिळाल्याने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. अशा बाजारपेठा नियमित भरवण्याची गरज आहे."
धुळेकर नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 'अमृत पेठ – थेट बाजारपेठ' हा उपक्रम उद्योजकांसाठी प्रेरणादायी आणि यशस्वी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सहभागी उद्योजकांनी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. हेमंत पाठक, अमृत सखी वैशाली कुलकर्णी तसेच संपूर्ण अमृत टीमचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. यावेळी श्री. हेमंत पाठक यांनी सर्व स्टॉलधारक आणि धुळेकर नागरिकांचे आभार मानत, भविष्यातही स्थानिक उद्योजकांना सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अमृतच्या माध्यमातून अशाच नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment