छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला भेट दिल्यावर लाभार्थ्याने व्यक्त केली प्रतिक्रिया
छत्रपती संभाजीनगर : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयाला लाभार्थी संदेश सुरेशराव बोरखडीकर यांनी २५ डिसेंबर रोजी भेट दिली. या वेळी त्यांना अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.
संकल्प खानावळ या नावाचा श्री. बोरखडीकर यांचा व्यवसाय असून, त्यासाठी त्यांनी मागील महिन्यात सारस्वत बँकेकडून कर्ज घेतले आहे. त्या कर्जावर व्याजपरतावा योजनेचा लाभ मिळावा यासाठी त्यांचा अर्ज भरून सादर करण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया अल्प वेळेत पूर्ण झाल्याने लाभार्थी श्री. बोरखडीकर यांनी समाधान व्यक्त केले.
या वेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेले श्री. दोड यांनी अमृत संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, 'इतर ठिकाणी यासाठी मोठी धावपळ व आर्थिक जोखीम उचलावी लागते; मात्र अमृत संस्थेमध्ये ही सेवा पूर्णपणे विनामूल्य, पारदर्शक आणि तत्परतेने दिली जाते, हे प्रत्यक्ष अनुभवातून स्पष्ट झाले आहे.'
संदेश बोरखडीकर म्हणाले, 'शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक चकरा माराव्या लागतात, अशी माझी समजूत होती; मात्र अमृत संस्थेमार्फत अतिशय सोप्या व जलद पद्धतीने अर्जप्रक्रिया पूर्ण झाली. या योजनेमुळे माझ्यासारख्या नवउद्योजकांना व्यवसाय उभारण्यासाठी मोठे पाठबळ मिळत आहे.'
या प्रसंगी अमृत संस्थेचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश भास्करराव रोडे, तसेच अमृतसखी ऋचा शर्मा उपस्थित होत्या. अमृत संस्थेमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे उद्योजकांना प्रत्यक्ष लाभ मिळत असून, संस्थेच्या कार्यपद्धतीबद्दल लाभार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ होत आहे.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment