खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी अमृतची सुवर्णसंधी; उद्योग कर्जावर १२% पर्यंत व्याज परतावा

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुण-तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबवत आहे.

खुल्या प्रवर्गातील तरुणांसाठी अमृतची सुवर्णसंधी; उद्योग कर्जावर १२% पर्यंत व्याज परतावा मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर :खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील तरुण-तरुणींनी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करून स्वावलंबी व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांनी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे उद्योगासाठी घेतलेल्या बँक कर्जावरील व्याजाचा मोठा भार लाभार्थ्यांवर न पडता अमृत संस्थेकडून व्याज परतावा दिला जाणार आहे.या योजनेअंतर्गत उद्योगासाठी घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कमाल १२% पर्यंत व्याज परतावा लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केला जाणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेने केले आहे.

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, हिंदू राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याने उद्योग किंवा व्यवसायासाठी राष्ट्रीयकृत, सहकारी, जिल्हा मध्यवर्ती, शेड्यूल किंवा खासगी बँकेकडून कर्ज घेणे आवश्यक आहे. बँकेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार कर्जाचे हप्ते नियमित आणि वेळेवर भरल्यास कर्जावरील केवळ व्याजाची रक्कम , कमाल १२ टक्क्यांच्या मर्यादेत, अमृत संस्थेकडून लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. मात्र, बँकेकडून आकारण्यात येणारे इतर शुल्क किंवा चार्जेस या योजनेअंतर्गत देय राहणार नाहीत. तसेच व्याज परतावा हा १५ लाख रुपये पर्यंत घेतलेल्या कर्जावर देण्यात येणार आहे.

योजनेसाठी अर्जदाराने अमृत संस्थेच्या पात्रता निकषांची पूर्तता करणे आवश्यक असून, उद्योगासाठी आवश्यक परवाने, उद्यम नोंदणी (असल्यास), व्यवसायाचा प्रकल्प अहवाल, आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र किंवा ईडब्ल्यूएस, डोमिसाईल, शैक्षणिक कागदपत्रे, बँक खाते आधारशी जोडलेले असणे, तसेच आवश्यक इतर कागदपत्रे सादर करावी लागतील. अर्जदार कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.

अमृत संस्थेच्या स्वयंरोजगार व उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या लाभार्थ्यांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना किंवा परशुराम गट व्याज परतावा योजना, या दोन्हीपैकी केवळ एका योजनेचाच लाभ घेता येणार आहे.

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृत विभागीय व जिल्हा कार्यालय, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा किंवा ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६ या क्रमांकावर संपर्क करून योजनेची सविस्तर माहिती घ्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 03:21 PM News publication time | Views: 735 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Rucha S. Sharma News publisher name | Date: 18-07-2026 News publication date | Time: 03:21 PM News publication time | Views: 735 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement