महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने २० व २१ जुलै २०२६ रोजी पुण्यात उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. युवक-युवती, महिला, बचत गट, स्टार्टअप उद्योजक तसेच लघु व मध्यम उद्योजकांसाठी हे दोन दिवसीय प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे.
२० व २१ जुलै रोजी पुण्यात उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण; व्यवसाय उभारणीसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने २० व २१ जुलै २०२६ रोजी पुण्यात उद्योजकता विकास प्रशिक्षण (Entrepreneurship Development Programme - EDP) आयोजित करण्यात आले आहे. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवती, महिला, बचत गट, स्टार्टअप उद्योजक तसेच लघु व मध्यम उद्योजकांसाठी हे दोन दिवसीय प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षणामध्ये उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व महत्त्वाच्या बाबींवर अनुभवी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्यवसायाची निवड, व्यवसाय आराखडा (Business Plan) तयार करणे, बाजारपेठेचा अभ्यास, आर्थिक नियोजन, भांडवल उभारणी, उद्योग नोंदणी, परवाने, शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, ग्राहक व्यवस्थापन आणि व्यवसाय वृद्धीच्या प्रभावी तंत्रांची सविस्तर माहिती सहभागींस दिली जाणार आहे. याशिवाय उद्योजकासाठी आवश्यक असलेले नेतृत्वगुण, संवाद कौशल्य, आर्थिक शिस्त, जोखीम व्यवस्थापन तसेच उद्योग सुरू करताना होणाऱ्या सामान्य चुका टाळण्याबाबतही मार्गदर्शन केले जाईल. कमी भांडवलात उद्योग सुरू करण्याच्या संधी, स्थानिक बाजारपेठेतील व्यवसायाच्या संधी आणि शासकीय योजनांचा प्रभावी लाभ कसा घ्यावा, याबाबत प्रत्यक्ष उदाहरणांसह माहिती दिली जाणार आहे. या प्रशिक्षणामुळे सहभागी युवक-युवतींना केवळ सैद्धांतिक ज्ञानच नव्हे, तर व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक व्यावहारिक कौशल्येही आत्मसात करता येणार आहेत. राज्यातील नवउद्योजकांना सक्षम बनविणे, स्वयंरोजगाराला चालना देणे आणि रोजगारनिर्मितीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या इच्छुकांनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन स्वतःच्या व्यवसायाच्या स्वप्नांना नवी दिशा द्यावी, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment