महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे युवक-युवतींसाठी मोफत सोलर (Solar PV Installation & Maintenance) प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
बुलढाणा जिल्हात मेहकर येथे लवकरच मोफत सोलर प्रशिक्षण; युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने मेहकर येथे युवक-युवतींसाठी मोफत सोलर (Solar PV Installation & Maintenance) प्रशिक्षण कार्यक्रम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. देशभरात सौरऊर्जेचा वाढता वापर, प्रधानमंत्री सूर्यघर योजना आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता प्रशिक्षित सोलर तंत्रज्ञांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून अमृत व एमसीईडीच्या माध्यमातून युवक-युवतींना अत्याधुनिक व रोजगाराभिमुख सोलर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सोलर पीव्ही सिस्टीमची स्थापना (Installation), देखभाल (Maintenance), दुरुस्ती (Troubleshooting), विद्युत सुरक्षितता, उपकरणांची हाताळणी तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासोबतच प्रशिक्षणार्थींना रोजगार, स्वयंरोजगार, शासकीय योजनांचा लाभ आणि स्वतःचा सोलर व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन देखील करण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या युवक-युवतींना भविष्यातील वाढत्या सौरऊर्जा क्षेत्रात करिअर घडविण्याची आणि आर्थिक स्वावलंबनाची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, पात्रता, आवश्यक कागदपत्रे, प्रशिक्षणाचा कालावधी, प्रशिक्षण स्थळ तसेच अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील परिसरातील इच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा व अमृत आणि एमसीईडीकडून जाहीर होणाऱ्या पुढील सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment