महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला.
अमृत व एमसीईडीच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणाचा उत्साहात शुभारंभ खामगाव, दि. १5 जुलै : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने खामगाव येथे आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. महिलांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमृत संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक श्री. धनंजय कुळकर्णी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सिंधी समाजाचे अध्यक्ष श्री. दर्शनलाल वर्मा,अमृतचे बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमानी, एमसीईडीचे श्री. गणेश गुप्ता, सौ. उषा मोटवानी व सौ. सपना मखेजा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी महिलांनी सहभाग नोंदविला. या प्रशिक्षणामध्ये महिलांना आधुनिक ब्युटी पार्लर व्यवसायासाठी आवश्यक असलेले व्यावसायिक कौशल्य, सौंदर्य उपचारांचे तांत्रिक ज्ञान, ग्राहक सेवा, व्यवसाय व्यवस्थापन तसेच स्वयंरोजगाराच्या विविध संधींबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास व कौशल्य प्राप्त होणार असून, त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत मिळणार आहे. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. जिग्नेश कमानी यांनी अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास, स्वयंरोजगार, उद्योजकता विकास व शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. उपलब्ध योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले. प्रमुख पाहुण्यांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत, कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनून यशस्वी उद्योजिका म्हणून समाजात नवे स्थान निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त केला. हा प्रशिक्षण उपक्रम महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 1 Comments
Pooja Rajput
Ye yojna baho upyogi hai isake vajah se bahotsi mahilao ko Rojgar prapt hoga iske liye sabko koshish karna chahiye jyada se jyada mahilao ko isaka labh uthana chahiye
Write a Comment