महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था "अमृत" रायगड जिल्हा कार्यालय अलिबाग तालुक्यातील चौल या गावी श्रीसुंदरनारायण मंदिरात महिलांसाठी "अमृत रानभाजी पदार्थ स्पर्धा २०२६"चं आयोजन काल गुरुवार दि.१६जुलै २०२६ रोजी करण्यात आले होते
महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था "अमृत" रायगड जिल्हा कार्यालय अलिबाग तालुक्यातील चौल या गावी श्रीसुंदरनारायण मंदिरात महिलांसाठी "अमृत रानभाजी पदार्थ स्पर्धा २०२६"चं आयोजन काल गुरुवार दि.१६जुलै २०२६ रोजी करण्यात आले होते.यात तेरा महिलांनी भाग घेतला होता. परीक्षिका म्हणून रेवदंडा येथील सौ.मेघना आठवले व सौ.सुहासिनी शेंडेय यांनी जबाबदारी उत्तमरीत्या निभावली. या स्पर्धेमधे सौ. मानसी जोगळेकर यांना प्रथम क्रमांक,सौ. स्नेहल विद्वान्स यांना द्वितीय क्रमांक तर सौ. कांचन जोशी यांना तृतीय क्रमांक मिळाला. प्रारंभी दोन्ही परीक्षिकांचं स्वागत करण्यात आलं.नंतर दीपप्रज्वलन करून श्री सुंदर नारायण,माता अन्नपूर्णा देवी आणि भारतमाता यांची पुष्पहार अर्पण करून पूजा केली. त्यावेळी उपस्थित महिलांनी जगद्गुरु आद्य शंकराचार्यविरचित अन्नपूर्णास्तोत्राचं पठण केलं.सौ.सुषमा आचार्य यांनी दोन्ही परीक्षिकांचा समर्पक शब्दात परिचय करून दिल्यावर "अमृत"संस्थेचे रायगड जिल्हा व्यवस्थापक श्री.शैलेश वि.मराठे व उपव्यवस्थापक श्री.मंगेश ढेबे यांनी खुल्या वर्गातील विविध घटकातील होतकरू तरुणांसाठी, महिलांसाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींसाठी संस्थेने सुरु केलेल्या विविध योजनांची माहिती दिली व त्यांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.आपण नोकरी करण्यापेक्षा इतरांना नोकर्या देण्याचं आवाहन त्यांनी या प्रसंगी केलं.
त्यानंतर सर्व तेरा स्पर्धकांनी आपापल्या पाकपदार्थांची सुंदर व आकर्षक मांडणी केली.परीक्षिकांना आपण केलेल्या पाकक्रियेची,त्यात वापरलेल्या रानभाजीची तिच्या गुणवैशिष्ट्यांसह व औषधी गुणधर्मांसह मौखिक व लिखित माहिती दिली.स्पर्धेचा निर्णय जाहीर झाल्यावर विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पारितोषके देण्यात आली.त्याच बरोबर सर्व स्पर्धकांना भेटवस्तू व प्रशस्तिपत्रके देण्यात आली. या नंतरच्या कार्यक्रमात श्री.श्रीपाद गो.केळकर(चौल/कल्याण)यांनी वर्षाकालीन रानभाज्यांचं व भरडधान्यांचं (Millets) आरोग्यसंपन्नतेसाठी तसंच विविध व्याधिनिर्मूलनासाठी दैनंदिन आहारातील स्थान याविषयी सविस्तर माहिती दिली. ज्ञानेश्वरमाउलींच्या पसायदान पठणानं कार्यक्रमाची सांगता झाली.संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री.श्रीपाद गो.केळकर यांनी केले होते.या कार्यक्रमाच्या यशस्वितेमधे सौ.सुषमा आचार्य,श्री.महेंद्र साठे व श्री.श्रीनिवास गो.केळकर यांनी परिश्रम घेतले. तेथील स्थानिकांनी सुद्धा मोलाची मदत केली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment