अमृत सक्षम घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाच्या अनुषंगाने अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक ओंकारजी शेटे व जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनी नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे यांची भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली.
नांदेड | प्रतिनिधी अमृत संस्थेच्या "अमृत सक्षम घनकचरा व्यवस्थापन" या महत्त्वपूर्ण उपक्रमाच्या अनुषंगाने आज नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त मा. महेश डोईफोडे यांची अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक ओंकारजी शेटे व जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाची उद्दिष्टे, अंमलबजावणीची कार्यपद्धती, नागरिकांचा सहभाग तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने या उपक्रमाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती आयुक्तांना देण्यात आली. यावेळी आयुक्त महेश डोईफोडे यांनी या विषयासंदर्भात संबंधित अधिकारी नितीन गाढवे यांची भेट घेऊन पुढील कार्यवाही करण्याचे मार्गदर्शन केले. त्यानुसार ओंकारजी शेटे व सौरभ कुलकर्णी यांनी नितीन गाढवे यांची भेट घेऊन त्यांना उपक्रमासंदर्भातील निवेदन सादर केले व संपूर्ण माहिती दिली. या उपक्रमासाठी नांदेड महानगरपालिकेकडून आवश्यक ते सहकार्य, जनजागृती, प्रचार व प्रसिद्धी करण्यात येईल, तसेच उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सकारात्मक सहकार्य राहील, अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. अमृत सक्षम घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाच्या माध्यमातून शहरात स्वच्छता, कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत प्रभावी जनजागृती होण्यास मोठी मदत होणार असून, या उपक्रमाला महानगरपालिकेचे मिळणारे सहकार्य ही एक सकारात्मक व स्वागतार्ह बाब असल्याचे अमृत संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment