अकोल्यातील अजिंक्य यशवंत देशपांडे यांनी अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षणातून आधुनिक कौशल्य आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
अकोल्यातील अजिंक्य यशवंत देशपांडे यांनी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांच्या माध्यमातून नाशिक येथे आयोजित ड्रोन पायलट प्रशिक्षण (सिनेमॅटोग्राफी व व्हिडिओग्राफी) यशस्वीरीत्या पूर्ण केले. प्रशिक्षणाचा अनुभव सांगताना ते म्हणाले, "नाशिक येथे आम्हाला अत्यंत दर्जेदार प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणात प्रात्यक्षिकांवर विशेष भर देण्यात आल्यामुळे ड्रोन हाताळणी, सिनेमॅटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचे प्रत्यक्ष कौशल्य आत्मसात करता आले. तसेच प्रशिक्षणादरम्यान राहण्याची व भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती." ते पुढे म्हणाले, "मला अमृतच्या ड्रोन पायलट प्रशिक्षणाची माहिती वर्तमानपत्रातून मिळाली. त्यानंतर मी अमृत जिल्हा कार्यालय, अकोला येथे भेट दिली. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी माझ्या सर्व शंकांचे समाधान केले, आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे हे प्रशिक्षण पूर्ण करणे माझ्यासाठी सोपे झाले." या प्रशिक्षणामुळे आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रत्यक्ष अनुभव मिळाल्याचे सांगत त्यांनी लवकरच ड्रोन सिनेमॅटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेवटी त्यांनी आवाहन केले की, "अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्याधारित प्रशिक्षणांचा लाभ अकोल्यासह सर्व लक्षित गटातील युवक-युवतींनी घ्यावा. अशा प्रशिक्षणांमुळे रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतात."
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment