स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) तर्फे मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण २० जुलै २०२६ पासून सुरू होणार असून इच्छुकांनी १८ जुलैपर्यंत नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
परभणी-
स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी अमृत (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) तर्फे मोफत उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण २० जुलै २०२६ पासून सुरू होणार असून इच्छुकांनी १८ जुलैपर्यंत नाव नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
दहा दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. व्यवसायाचे नियोजन, बँक कर्ज प्रक्रिया, शासकीय योजनांचा लाभ, आर्थिक व्यवस्थापन, ब्रँडिंग, मार्केटिंग, ट्रेडमार्क, डिजिटल विक्री, उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे, कच्च्या मालाची उपलब्धता तसेच तयार मालासाठी बाजारपेठ कशी निर्माण करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. प्रशिक्षणाच्या पहिल्या चार दिवसांत प्रत्यक्ष (ऑफलाइन) सत्रे विभागीय व जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात येणार असून त्यानंतर सहा दिवस ऑनलाइन प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सहभागी लाभार्थ्यांना शासकीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय 'अमृत पेठ' या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उत्पादनांची ऑनलाइन विक्री, ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग आणि आधुनिक व्यवसाय तंत्रज्ञानाची माहितीही प्रशिक्षणादरम्यान दिली जाणार आहे. लघुउद्योग, सेवा उद्योग, कृषीपूरक व्यवसाय, ट्रेडिंग तसेच स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण विशेष उपयुक्त ठरणार आहे. अमृतच्या माध्यमातून यापूर्वी अनेक युवक-युवतींनी प्रशिक्षण घेऊन स्वतःचे उद्योग सुरू केले असून स्वावलंबनाकडे यशस्वी वाटचाल केली आहे. त्यामुळे रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याची संधी इच्छुकांनी साधावी आणि नोंदणी करून या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालयाने केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क- ७३९१०६५४७३
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment