'एमसीईडी'च्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमाला चांगला प्रतिसाद
सावंतवाडी : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था कार्यरत आहे. अमृत संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लक्ष्यित गटातील व्यक्तींसाठी निःशुल्क वेबिनारचे आयोजन केले होते. २४ डिसेंबर रोजी रात्री झालेल्या या वेबिनारला जिल्ह्यातील ६०हून अधिक व्यक्ती उपस्थित होत्या. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती या वेबिनारमध्ये देण्यात आली. त्यात अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील युवक-युवती, तसेच पुरुष-महिलांकरिता उद्योजकता व कौशल्य विकास प्रशिक्षण, शासकीय योजना, अनुदान, प्रोत्साहन योजना आदींचा समावेश होता.
यामध्ये 'एमसीईडी'चे श्रीकांत कुलकर्णी, एमसीईडीचे सिंधुदुर्गातील अधिकारी राजेश कांदळगावकर, अमृत संस्थेचे कोकण विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर सहभागी झाले होते. वेबिनारला जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. श्रीकांत कुलकर्णी आणि अमित सामंत यांनी या वेबिनारमध्ये मार्गदर्शन करतानाच लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन त्यांचे शंकानिरसन केले. या वेबिनारमुळे अमृत संस्थेचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढायला मदत होईल, असा विश्वास श्रीराम केळकर यांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment