छत्रपती संभाजीनगर येथे अमृतच्या उद्यम कौशल्य प्रशिक्षण योजना (EDP) अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात अमृत उद्यम कौशल्य प्रशिक्षण योजना (EDP) अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आज प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना उद्योजकतेची नवी दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाला अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक अमित सामंत, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच गुजराती समाजाचे अध्यक्ष राजेश मेहता, ब्राह्मण महिला मंचाच्या अध्यक्षा विजया कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विभागीय व्यवस्थापक अमित सामंत यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकता योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणानंतर केवळ प्रमाणपत्र घेऊन न थांबता स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाच्या वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा लाभ कसा घ्यावा, प्रकल्प अहवाल, बँक कर्ज, मार्गदर्शन व पुढील प्रक्रिया याबाबत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनीही उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देत, नोकरीच्या शोधात न राहता उद्योग उभारून स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले. अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊन रोजगारनिर्मितीमध्ये योगदान देण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच अमृत संस्थेच्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती देऊन लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत सखी मंजू कुलकर्णी आणि अमृत सखी रुचा शर्मा यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment