धुळ्यात महिलांसाठी अमृत संस्थेतर्फे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाचा प्रारंभ

एमसीईडी संस्थेच्या सहकार्याने ३० दिवसांचा मोफत प्रशिक्षण कार्यक्रम

धुळ्यात महिलांसाठी अमृत संस्थेतर्फे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाचा प्रारंभ मुख्य फोटो
धुळ्यात महिलांसाठी अमृत संस्थेतर्फे फॅशन डिझायनिंग प्रशिक्षणाचा प्रारंभ अतिरिक्त फोटो

धुळे : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे धुळ्यात आयोजित करण्यात आलेल्या फॅशन डिझायनिंगच्या मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच झाले. महिला व युवकांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने सक्षम करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने हा तीस दिवसांचा कार्यक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला एमसीईडी संस्थेच्या प्रकल्प अधिकारी सौ. आरती शिरोरलकर, सौ. भावना पवार, अमृतमित्र विलास चंद्रात्रे, अमृतसखी वैशाली कुलकर्णी, सौ. प्रभा परदेशी, प्रशिक्षिका सौ. मीरा सरोज, प्रशिक्षणार्थी लाभार्थी व अन्य मान्यवर उपस्थित होते. अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर यांनी ऑनलाइन माध्यमातून लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य व्यवस्थापक दीपक जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

या वेळी लाभार्थ्यांना उद्योग सुरू करण्याची संपूर्ण प्रक्रिया, फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील करिअरच्या संधी, पुढील ३० दिवसांत होणारे सैद्धांतिक व प्रात्यक्षिक प्रशिक्षण, बाजारपेठेतील मागणी, खर्च नियोजन, नफा व्यवस्थापन, तसेच स्वतःचा व्यवसाय यशस्वीरीत्या कसा उभारावा व टिकवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून सहभागी महिलांना डिझायनिंग, कटिंग, स्टिचिंग, फॅब्रिक सिलेक्शन, ट्रेंड अ‍ॅनालिसिस व ग्राहक व्यवस्थापन यांसारखी व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करता येणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अमृत व एमसीईडी संस्थेच्या माध्यमातून आवश्यक मार्गदर्शन, तसेच लागणारे सर्व सहकार्य वेळोवेळी करण्यात येणार आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

या उपक्रमामुळे धुळे जिल्ह्यातील महिलांना व युवकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याची संधी मिळणार असून, स्वयंरोजगार निर्मितीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news
Publisher: Hemant Pathak News publisher name | Date: 25-12-2025 News publication date | Time: 12:58 PM News publication time | Views: 92 Number of times this news has been viewed | District: dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words