महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'अमृत-सक्षम' उपक्रमातून कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकता विकसित करण्यासाठी राज्यभरातील युवक, महिला, बचत गट, व्यावसायिक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
"अमृत" मुळे कचरा व्यवस्थापन क्षेत्रात उद्योजकतेची नवी पहाट..! 'अमृत-सक्षम' उपक्रमातून महाराष्ट्रातील तरुण, महिला आणि व्यावसायिकांना उद्योजक बनण्याची सुवर्णसंधी.. महाराष्ट्रात आता कचरा व्यवस्थापन हे केवळ स्वच्छतेचे काम राहिलेले नाही, तर ते वेगाने वाढणारे 'हरित उद्योग' (Green Business) क्षेत्र बनले आहे. वाढते शहरीकरण आणि पर्यावरण नियमांमुळे या क्षेत्रात व्यवसायाच्या अभूतपूर्व संधी निर्माण झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर, 'अमृत' (AMRUT) आणि 'कुशाग्र इनोव्हेशन्स फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने "अमृत-सक्षम" हा विशेष उद्योजकता विकास उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. कचरा ही समस्या नाही तर उत्पन्नाचा उत्तम स्रोत..! रोजच्या कचऱ्यातून नियमित उत्पन्न आणि शाश्वत व्यवसाय उभा राहू शकतो, हे अनेकांनी सिद्ध केले आहे. सुकलेल्या फुलांपासून अगरबत्ती आणि धूप बनवणे. प्लास्टिक, कागद आणि काच रिसायकलिंग करणे. 'रिसोर्स रिकव्हरी सेंटर' (RRR) सुरू करणे.
योग्य तांत्रिक ज्ञान, व्यावसायिक मार्गदर्शन आणि बाजारपेठेची जोड मिळाल्यास तुम्हीही या क्षेत्रात स्वतःचा यशस्वी ब्रँड निर्माण करू शकता. 'अमृत-सक्षम' नेमके काय आहे? हे केवळ एक पुस्तकी प्रशिक्षण नाही, तर 'संकल्पनेपासून ते प्रत्यक्ष उद्योग उभारणीपर्यंतचा' एक परिपूर्ण प्रवास आहे. यामध्ये या व्यवसायामध्ये इच्छुक असलेल्या उमेदवाराला खालील गोष्टींचे टप्प्याटप्प्याने मार्गदर्शन मिळेल..: योग्य व्यवसायाची निवड करणे. आर्थिक नियोजन आणि बँक लोन प्रक्रिया समजून घेणे. शासकीय योजना व अनुदानाचा (Subsidy) लाभ घेणे. उत्पादनाची विक्री आणि बाजारपेठ (Market) मिळवणे.
या उपक्रमात कोण सहभागी होऊ शकते? या क्षेत्रातील कोणत्याही पूर्वानुभवाची गरज नाही. खालीलपैकी कोणीही यात अर्ज करू शकतात. तथापि अमृत च्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांना अमृत संस्थेमार्फत विविध योजनांचे लाभ मिळू शकतात. स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती महिला बचत गट (SHGs) विद्यमान व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणारे व्यावसायिक निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी सामाजिक संस्था (NGOs) व पर्यावरणप्रेमी नागरिक
प्रशिक्षणानंतर तुम्हाला काय मिळणार? ● तज्ज्ञांचे मार्गदर्शन: क्षेत्रातील अनुभवी मार्गदर्शकांचे थेट पाठबळ. ● शासकीय साहाय्य: अमृतच्या लक्षीत गटातील पात्र उमेदवारांना उद्योग उभारणीसाठी 'अमृत'च्या विविध योजनांतर्गत विशेष मदत. यामध्ये अमृत वैयक्तिक व्याज परतावा योजनेचा समावेश आहे. ● नेटवर्किंग: बाजारपेठेतील मोठे खरेदीदार आणि इतर उद्योजकांशी थेट संपर्क
नोंदणी कशी करावी? नोंदणी अत्यंत सोपी आहे! खालील लिंकवर क्लिक करून आपला अर्ज भरा : https://amrut-saksham.mahaamrut.org.in/ किंवा अमृत च्या www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा. यासंदर्भात इतर तपशील आणि माहितीसाठी अमृत संस्थेच्या प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा व्यवस्थापक यांच्या कार्यालयाला भेट द्या किंवा अमृत संस्थेच्या जिल्हा व्यवस्थापकांशी संपर्क साधून माहिती घेता येईल. यांचे संपर्क क्रमांक व पत्ता अमृत संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुढील प्रक्रिया: तुमची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, 'अमृत-सक्षम' टीम तुमच्याशी फोनद्वारे संपर्क साधेल. पात्र उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्यातील कार्यशाळेची तारीख, वेळ आणि पुढील प्रक्रियेची माहिती दिली जाईल.
युट्युब लाईव्ह सत्र : या व्यवसायासंदर्भात प्राथमिक माहिती मिळण्यासाठी AMRUT youtube वर (https://youtube.com/@mahaamrutpune?si=JZPTLSS9H9bPvnOf ) दिनांक १६ जुलै २०२६ ला ४ वाजता प्रसारित होणाऱ्या लाईव्ह सत्रामध्ये सहभागी व्हावे आणि प्राथमिक माहिती प्राप्त करून घ्यावी.
या उपक्रमात अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) मुंबई सुद्धा सामील होते आहे. आर्टीच्या लाभार्थी समूहाला सुद्धा याचा निश्चितच फायदा होईल. हा उपक्रम सुरू केल्याबद्दल श्री विजय जोशी सर अमृत चे महासंचालक आणि कुशाग्र संस्था यांचे AARTI चे व्यवस्थापकीय संचालक श्री सुनील वारे यांनी अभिनंदन केले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : 7757091859 ‘संधीची वाट पाहू नका, संधी निर्माण करा..! आजच या हरित क्रांतीचा भाग व्हा..!’ असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक यांनी केलेले आहे. अधिक माहिती संपर्क करा:- पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर - ४ सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९ जिल्हा व्यवस्थापक छत्रपती संभाजीनगर यांच्याशी संपर्क साधावा :- ७३९१०६५४७५ / ९४०३२००६०६
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment