महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अमृत मानसमित्र समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिली बॅच १६ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे.
हिंगोली, दि. १३ जुलै : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या वतीने मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्याच्या उद्देशाने अमृत मानसमित्र समुपदेशन प्रशिक्षण कार्यक्रमाची पहिली बॅच दि. १६ जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती, शिक्षक, प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते तसेच समुपदेशन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
या प्रशिक्षणामध्ये मानसिक आरोग्य, समुपदेशनाची तत्त्वे, प्रभावी संवाद कौशल्य, तणाव व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास तसेच विविध सामाजिक व वैयक्तिक समस्यांवर समुपदेशन करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचे तज्ज्ञांकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. प्रशिक्षणामुळे मानसिक आरोग्य क्षेत्रात सेवा देण्याबरोबरच करिअरच्या नव्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
प्रशिक्षणासाठी इच्छुकांनी www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. प्रवेश मर्यादित असल्याने लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी प्रशिक्षणासंदर्भातील अधिक माहितीसाठी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत गंगाधर धोतरे यांनी केले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment