ब्राह्मण समाजातील तरुण पिढीने उद्योग उभारण्यासाठी योजनांचे साह्य घेण्याचे आवाहन
वाळवा (जि. सांगली) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि वाळवा ब्राह्मण सभा यांच्या संयुक्त विद्यमाने वाळवा येथे २० डिसेंबर रोजी अमृत मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गासाठी काम करते. या योजनांची माहिती लक्ष्यित गटापर्यंत पोहोचवण्यासाठी अमृत मेळावा आयोजित करण्यात आला होता. लक्ष्यित गटात ब्राह्मण समाजाचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हृषीकेश हर्डीकर यांनी अमृत संस्थेच्या अधिकाऱ्यांची ओळख करून दिली. अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांचे त्यांनी स्वागत केले. बंडाकाका देशपांडे यांनी अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आपल्या समाजातील व्यावसायिकांना व महिलांना उद्योग-व्यवसाय उभा करण्यासाठी अमृत संस्थेच्या योजना उपयोगी असून, त्याचा समाजाला लाभ व्हावा यासाठी हा मेळावा आयोजित केला आहे, असे प्रास्ताविकात ब्राह्मण सभेचे अध्यक्ष प्रमोद पांडे यांनी सांगितले.
अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक शैलेंद्र जहागीरदार यांनी अमृत संस्थेच्या वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना, व्यावसायिकांसाठी वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम व इतर सर्व योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली. तसेच उपस्थितांच्या मनातील शंकांचे निरसन केले, प्रश्नांची उत्तरे दिली. ब्राह्मण समाजातील तरुण पिढीने अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा व उद्योग उभा करावे असे आवाहन त्यांनी केले. अमृतमित्र अभिजित कुलकर्णी यांनी आवश्यक कागदपत्रांबद्दल व निवड निकषांची सविस्तर माहिती दिली.
समारोपात डॉक्टर सुहास उमरणी यांनी शैलेंद्र जहागीरदार, अभिजित कुलकर्णी व उपस्थितांचे आभार मानले. तसेच समाजबांधवांनी व भगिनींनी या योजनांचा आपल्या उत्कर्षासाठी लाभ करून घ्यावा असे आवाहन केले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment