भारतीय माध्यमिक विद्यालयात 'अमृत वर्ग' उपक्रमाचा शुभारंभ.
भारतीय माध्यमिक विद्यालयात 'अमृत वर्ग' उपक्रमाचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर, दि. १२ : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अमृत वर्ग उपक्रमाचा शुभारंभ १० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहरातील एन-११ परिसरातील भारतीय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर गोराडे व शिक्षिका सौ. ए. के. देवरे यांची भेट घेऊन अमृतच्या विविध योजना, विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच अमृत वर्गाची संकल्पना याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
अमृत वर्गामध्ये विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्वगुण, संवादकौशल्य, नैतिक मूल्ये, शिस्त, देशभक्ती, सामाजिक जाणीव, सकारात्मक विचार, मानसिक सुदृढता आणि जीवनकौशल्ये विकसित करण्यावर भर दिला जातो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबरच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य या उपक्रमातून केले जाते. अमृत वर्गाची संकल्पना समजून घेतल्यानंतर प्राचार्य ज्ञानेश्वर गोराडे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून अमृत वर्गाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी दर्शविली. या अमृत वर्गाच्या नियोजनासाठी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे आणि अमृत मित्र रामेश्वर साळुंके यांनी पुढाकार घेतला. प्राचार्य ज्ञानेश्वर गोराडे यांची प्रतिक्रिया : "विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ पाठ्यपुस्तकांमधून होत नाही. त्यांच्यामध्ये संस्कार, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारे उपक्रम शाळेत होणे आवश्यक आहे. अमृत वर्ग ही अतिशय उपयुक्त संकल्पना असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना निश्चितच मोठा लाभ होईल. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम नियमितपणे आयोजित करण्यासाठी आम्ही सहकार्य करू."
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment