हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात अमृत वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमात विद्यार्थ्यांना सुसंस्कार, नैतिक मूल्ये, शिस्त, देशभक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन करण्यात आले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात मुलांमध्ये सुसंस्कार, नैतिक मूल्ये आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास घडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या अमृत वर्गाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वर्गात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभागी होत विविध उपक्रमांचा आनंद घेतला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, चांगले संस्कार, देशभक्तीपर गीते, प्रेरणादायी कथा, विविध बौद्धिक व मैदानी खेळ तसेच व्यक्तिमत्त्व विकासाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग नोंदवत सकारात्मक प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, सामाजिक जाणीव, नेतृत्वगुण आणि सुसंस्कार रुजण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. पालकांनीही आजच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशा संस्कारवर्गांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगून या उपक्रमाचे कौतुक केले. भविष्यातही कळमनुरी तालुक्यासह हिंगोली जिल्ह्यात अशा प्रकारचे अमृत वर्ग नियमितपणे आयोजित करून अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत संस्कार आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन पोहोचविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment