डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन पायलट लायसेन्स मिळाल्याने वाढला आत्मविश्वास
वर्धा : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या संस्थेने आयोजित केलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ वर्धा जिल्ह्यातील अमित पांडे आणि सूरज पीडिया यांनी घेतला आहे. त्यांनी हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, लवकरच ते या अनुषंगाने व्यवसाय सुरू करणार असून, उद्योजक होणार आहेत.
हा दहा दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात आले होते. प्रशिक्षण कालावधीत लाभार्थ्यांच्या राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था अमृत संस्थेने केली होती. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना नागरी विमान वाहतूक संचालनालय अर्थात डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन पायलट लायसेन्स प्रदान करण्यात आले. या लायसेन्सची वैधता १० वर्षांची आहे.
या कार्यक्रमामध्ये अमित पांडे यांनी ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण व नकाशे तयार करणे या क्षेत्रातील प्रशिक्षण घेतले असून, सूरज पीडिया यांनी कृषी क्षेत्रातील ड्रोन वापर या विषयावर प्रशिक्षण घेतले आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर वर्धा जिल्ह्यातील हे दोन्ही लाभार्थी अत्यंत आनंदित असून, लवकरच ते आपापल्या क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय सुरू करून उद्योजक म्हणून कार्यरत होणार आहेत. आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लोकांना आवश्यक सेवा प्रदान केल्या जाणार असून, त्या माध्यमातून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. या उद्योगातून चांगले उत्पन्न मिळवण्याचा आत्मविश्वास या प्रशिक्षण कार्यक्रमानंतर मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
लाभार्थ्यांनी आपला अनुभव व्यक्त करताना सांगितले, की प्रशिक्षणादरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेली व्यवस्था अतिशय उत्तम होती. अमृत संस्थेच्या विविध योजनांबाबत ते इतर युवक-युवतींना माहिती देऊन जास्तीत जास्त जणांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करतील, असे आश्वासनही त्यांनी दिले. अमृत संस्थेमार्फत स्वयंरोजगार व रोजगार निर्मितीसाठी डीजीसीए मान्यताप्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत ड्रोनच्या साहाय्याने सर्वेक्षण व नकाशे तयार करणे, शेतीमध्ये ड्रोनचा वापर, फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनात ड्रोनचा वापर, तसेच ड्रोन मास्टर ट्रेनर यांसारखे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क : ऋषीकेश खराटे, वर्धा जिल्हा व्यवस्थापक, अमृत : 9112227632
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment