सिल्लोड येथील गजानननगर येथील जिल्हा परिषद शाळेत अमृत वर्गाचा शुभारंभ झाला आहे
गजानन नगर जिल्हा परिषद शाळेत अमृत वर्गाचा शुभारंभ. सिल्लोड, प्रतिनिधी : गजानन नगर येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने अमृत वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी केला. या अमृत वर्गातून संस्कारक्षम वयातील मुलांना विविध खेळ, गोष्टी, कार्यानुभव यांच्या माध्यमातून विविध जीवनमुल्ये शिकविण्याचा प्रयत्न होणार आहे. यातून अभ्यासासाठी लागणाऱ्या कौशल्यांचा विकासही होतो.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वंदना बालचंद जाधव तसेच सहशिक्षिका श्रीमती ज्योती पुंडलिक सुरे उपस्थित होत्या. त्यांनी अमृत वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, व्यक्तिमत्त्व विकास, सकारात्मक विचार, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेमाची भावना विकसित होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला.
योगेश रोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "आजचा सुसंस्कारित विद्यार्थी म्हणजे उद्याचा सक्षम, जबाबदार आणि राष्ट्रभिमानी नागरिक," असे सांगितले. अमृत वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment