छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेकडून विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात. आता अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील महिलांसाठी आरी वर्क (Aari Work) कढाई कलेचे पायाभूत ते प्रगत (बेसिक टू अॅडव्हान्स) स्तरावरील व्यावसायिक प्रशिक्षण पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
फॅशन क्षेत्रात आरी वर्कला मोठ्या प्रमाणात मागणी असते. म्हणून प्रशिक्षणासाठी या विषयाची निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये आरी वर्कचे मूलभूत तंत्र, तसेच अॅडव्हान्स डिझाइन्सचे सखोल प्रात्यक्षिक मार्गदर्शन केले जाते. यामध्ये ब्लाउज डिझाइन, जरी, दोरा, मणी, स्टोन वर्क, कुंदन, मिरर व कट वर्क, तसेच डिझाइन ट्रेसिंग व मार्किंग यांचा समावेश आहे. या कोर्सचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी डिझायनरकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहभागी महिलांना शासनमान्य प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्या प्रमाणपत्राच्या आधारे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्जपुरवठा घेता येणार आहे. कमी गुंतवणुकीत रोजगारनिर्मिती व उत्पन्नवाढीची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून, प्रवेश मर्यादित आहेत. इच्छुक महिलांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे किंवा जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांच्याशी संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संपर्क :
योगेश भास्करराव रोडे
छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक - अमृत
मोबाइल : 9403200606
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment