तरुणांना आधुनिक कौशल्य मिळावे आणि रोजगारासोबत स्व-रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत 'AMRUT DRONE MISSION' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोन क्षेत्रात रोजगाराच्या संधी झपाट्याने वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर युवक-युवतींना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेतर्फे "अमृत ड्रोन मिशन" राबविण्यात येत आहे. या मिशनअंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण, ड्रोनची सुरक्षित हाताळणी, देखभाल, कृषी क्षेत्रातील ड्रोनद्वारे फवारणी, सर्वेक्षण, मॅपिंग, आपत्ती व्यवस्थापन तसेच विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर याबाबत सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणासाठी अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. आज कृषी, बांधकाम, पायाभूत सुविधा, सुरक्षा, पर्यावरण, भू-सर्वेक्षण आणि लॉजिस्टिक्स यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षित ड्रोन ऑपरेटरची मोठी मागणी आहे. त्यामुळे अमृताचे हे ड्रोन मिशन युवकांसाठी रोजगार, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध करून देणारे ठरणार आहे. इच्छुक युवक-युवतींनी या प्रशिक्षणात सहभागी होऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन अमृत संस्थेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृत कार्यालयाशी संपर्क साधावा.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment