सायबर सुरक्षा- लेख क्र.-३
सर्वात आधी एक स्पष्ट करतो की, ज्यांना dashcam (डॅशकॅम) बद्दल माहित आहे आणि ज्यांनी आपल्या कारमध्ये तो बसवला आहे त्यांना दंडवत ! मात्र ज्याच्याकडे कार आहे मात्र डॅशकॅम बसवला नाही त्यांच्यासाठी हि पोस्ट आहे. तर भारतात रोड ऍक्सीडेन्ट वरचेवर वाढत आहेत. दिव्य मराठीच्या सर्वेनुसार रस्ते अपघातांमुळे भारताचे दरवर्षी तब्बल ४ लाख कोटी (GDP च्या सुमारे ३%) इतके प्रचंड आर्थिक नुकसान होते. या अपघातांमुळे दररोज ५०० कोटींपेक्षा जास्त रुपयांचे नुकसान होते. खूप भीषण आकडेवारी आहे ही ! शिवाय पोलीस केस, कोर्ट कचेऱ्या, वकील खर्च असा सगळं मनस्ताप लोकांना सोसावा लागतो तर हा सगळा त्रास dashcam मुळे वाचू शकतो. असं माझ्या निरीक्षणात आलं आहे. डॅशकॅम म्हणजे कारमध्ये बसवण्याचा एक छोटा मोबाइलसारखा कॅमेरा असतो. हे माहिती असू द्या ! मात्र तो गाडीत नसेल तर आणि असेल तर काय होत ते पाहूया-
१) Crash-for-Cash प्रकार : गुंड प्रवृत्तीच्या काही टोळ्या शहरात फिरतात आणि श्रीमंतांची कार पाहून त्याला हेरून त्याच्या मागावर राहतात आणि शक्यतो वर्दळीच्या ठिकाणी मग मुद्दाम बळेच स्वतःच्या कारची हलकीशी ठोकर त्या कारला मारून नंतर आरडाओरडा करून पब्लिक गोळा करून श्रीमंतांकडून "नुकसानभरपाई" च्या नावाखाली लुटलं जात. जर डॅशकॅममध्ये संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली असेल तर ती पोलिस तपासात आणि विमा कंपनीसमोर महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. त्यामुळे खोटे आरोप करणे समोरच्याला कठीण जाते.
२) कार अपघात झाल्यावर यात चूक कुणाची होती हे सिद्ध करता आलं नाही तर कार मालकाला त्याची चूक नसतानाही मग विमा कंपनी भरपाई द्यायला नाकारते. अपघातात चूक कुणाची हे सिद्ध करणे, हे डॅशकॅमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. उदा. सिग्नल कोण तोडला? कोण चुकीच्या लेनमध्ये आला? कोण अचानक ब्रेक मारला? कोण U-turn घेत होता?
याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्यास विमा कंपनी, पोलीस आणि न्यायालयाला वस्तुस्थिती समजण्यास मदत होते. मात्र महत्त्वाचे: डॅशकॅम म्हणजे अंतिम निर्णय नाही. तो एक मजबूत इलेक्ट्रॉनिक पुरावा आहे. इतर पुरावेही तपासले जाऊ शकतात.
३) जर चालकावर चुकीचा नियमभंग केल्याचा आरोप वाहतूक नियंत्रकाकडून झाला आणि तो प्रसंग डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाला असेल, तर चालकाला स्वतःची बाजू मांडण्यासाठी महत्त्वाचा पुरावा मिळू शकतो.
४) समजा कार ऍक्सीडेन्ट झाला अन त्यात तुमची चूक नसतानाही समोरच्या कारचे मोठं नुकसान झालं असेल तर साहजिकच तो कोर्टात केस करतो. अशावेळी तुमची बाजू बरोबर होती हे सांगणारे तुमचे साक्षीदार देखील कोर्टात ऐनवेळी पलटी मारू शकतात त्यामुळे तुम्ही केस हरता आणि आर्थिक फटका बसतो मात्र फक्त डॅशकॅम असल्यामुळे प्रत्येक केस जिंकलीच जाईल असे नाही. न्यायालय पुराव्याची सत्यता, सलग रेकॉर्डिंग, इतर पुरावे, तज्ज्ञांचे मत इत्यादी सर्व गोष्टींचा विचार करते. हेही लक्षात घ्या. मात्र तुम्हाला केसमध्ये पाठबळ मिळू शकत !
तर या सगळ्यावर प्रभावी उपाय म्हणजे dashcam आहे असं मला वाटत. कारण वरील चारही घटनेमध्ये जर तुमच्या कारमध्ये dashcam असेल तर तुम्ही तो पुरावा म्हणून समोरच्याला दाखवून तुमची सुटका करून घेऊ शकता, तुमची बाजू बरोबर असल्याचे सिद्ध करणारा dashcam तुमच्या कारमध्ये असल्याने आर्थिक दृष्ट्या तुम्हाला कुणी फसवू शकणार नाही, लुटू शकणार नाही इतके सगळे फायदे पाच दहा हजार रुपये किमतीच्या dashcam मुळे होतात असं मला वाटत. अपघात झाल्यावर वाद कमी व्हावेत, निरपराध माणूस आर्थिक व मानसिक त्रासातून वाचावा." हा माझा या पोस्टचा हेतू आहे. डॅशकॅमचे आणखी काही महत्त्वाचे फायदे : १. Hit and Run मध्ये मदत : कोणी धडक देऊन पळून गेला तरी वाहन क्रमांक रेकॉर्ड होण्याची शक्यता असते.
२. विमा क्लेम जलद होऊ शकतो : वाद कमी असल्यामुळे विमा प्रक्रियेला मदत होऊ शकते.
३. चोरी किंवा Parking Damage : अनेक डॅशकॅममध्ये Parking Mode असतो. तुमची कार पार्क असताना कोणीतरी धडक दिली, काच फोडली, चोरीचा प्रयत्न केला, तर तेही रेकॉर्ड होऊ शकते (मॉडेलनुसार).
४. चुकीचे आरोप टाळता येतात : उदा. पादचारी मुद्दाम समोर आला., दुचाकीस्वार अचानक कट मारतो., समोरचा वाहनचालक उलट तुमच्यावर दोष ठेवतो. व्हिडिओमुळे सत्य स्पष्ट होण्यास मदत होते.
५. कुटुंबातील इतर चालकांसाठी : घरातील मुलगा, मुलगी किंवा ज्येष्ठ नागरिक कार चालवत असतील तर अपघात झाल्यास नेमके काय झाले हे घरच्यांना तसेच पोलिसांना समजू शकते.
६. व्यावसायिक वाहनांसाठी : Taxi, Cab, School Bus, Company Car यांच्यासाठी तर डॅशकॅम अधिक उपयोगी मानला जातो.
७. सुंदर प्रवास जतन करता येतो : हा छोटा पण आनंददायी फायदा आहे. लांबच्या प्रवासातील घाट, पाऊस, हिमवर्षाव, वन्यजीव हे क्षणही जतन होतात. जे नंतर तुम्हाला आनंद देतात.
पण डॅशकॅम म्हणजे जादूची कांडी नाही त्यात उणिवा राहू नयेत यासाठी काही टिप्स : कॅमेऱ्याचा कोन चुकीचा असेल तर घटना दिसणार नाही. स्वस्त कॅमेऱ्याची गुणवत्ता रात्री कमी असू शकते. मेमरी कार्ड निकृष्ट असेल तर रेकॉर्डिंग खराब होऊ शकते. कॅमेरा बंद असेल किंवा बिघडलेला असेल तर उपयोग होणार नाही. काही प्रसंगी नंबर प्लेट स्पष्ट दिसेलच असे नाही. "डॅशकॅम हा अपघात टाळत नाही; पण अपघातानंतर सत्य सिद्ध करण्यात, खोटे आरोप टाळण्यात, विमा प्रक्रियेला मदत करण्यात आणि कायदेशीर वाद कमी करण्यात तो अत्यंत उपयुक्त ठरू शकतो." मला वाटते, "₹५०००–₹१०,००० खर्च करून तुम्ही गाडीत एक असा शांत (मूक) साक्षीदार बसवता, जो बोलत नाही, पण गरज पडली तर सत्य बोलून दाखवतो." आता डॅशकॅम कोणता निवडावा असा प्रश्न पडेल तर कोणत्या कंपनीचा घ्यावा हे मी सांगणार नाही (ते प्रमोशन होईल. आणि ते मी कधीच करत नाही) मात्र डॅशकॅमचे निकष काय असावेत ते सांगतो !
१) किमान Full HD (1080p) रेकॉर्डिंग : वाहन क्रमांक, सिग्नल, रस्ता, घटना शक्य तितकी स्पष्ट दिसण्यासाठी Full HD किमान असावे. बजेट असेल तर 2K किंवा 4K अधिक चांगले.
२) Night Vision (रात्रीची चांगली गुणवत्ता) : भारतात अनेक अपघात रात्री होतात. दिवसा छान व्हिडिओ काढणारे अनेक कॅमेरे रात्री मात्र निरुपयोगी ठरतात.
३) Wide Angle Lens : साधारण १४०° ते १७०° पर्यंतचा अँगल चांगला मानला जातो. त्यामुळे डावी लेन, उजवी लेन, समोरील संपूर्ण रस्ता रेकॉर्ड होतो.
४) G-Sensor : अपघात झाल्यावर त्या क्षणाचा व्हिडिओ आपोआप "Lock" होतो. नंतर Loop Recording सुरू राहिले तरी तो महत्त्वाचा व्हिडिओ डिलीट होत नाही. हा अत्यंत महत्त्वाचा फीचर आहे.
५) Loop Recording : मेमरी भरली की सर्वात जुना व्हिडिओ आपोआप हटवून नवीन रेकॉर्डिंग सुरू राहते. हाताने रोज मेमरी रिकामी करण्याची गरज पडत नाही.
६) Parking Mode : कार पार्क असताना धडक तोडफोड चोरीचा प्रयत्न रेकॉर्ड होऊ शकतो (हार्डवेअर सेटअप आणि मॉडेलनुसार).
७) GPS (ऐच्छिक पण उपयुक्त) : यामुळे वाहनाचा वेग, स्थान, मार्ग, याची नोंद राहते. काही वेळा हा तपशील उपयोगी ठरू शकतो.
८) Rear Camera : फक्त पुढचा नाही. मागचाही कॅमेरा असेल तर मागून धडक, मागील वाहनाचे वर्तन, रेकॉर्ड होते. माझ्या मते शक्य असल्यास Front + Rear Camera हा अधिक चांगला पर्याय आहे.
९) Wi-Fi / Mobile App : मोबाईलवरच लगेच व्हिडिओ पाहता येतो. मेमरी कार्ड काढण्याची गरज पडत नाही.
१०) चांगल्या दर्जाचे Memory Card : हा मुद्दा लोक अनेकदा विसरतात. साधे स्वस्त कार्ड लवकर खराब होऊ शकते. High Endurance प्रकारचे microSD कार्ड वापरणे अधिक योग्य, कारण डॅशकॅम सतत लिहिणे (continuous writing) करत असतो.
११) उष्णता सहन करण्याची क्षमता : भारतात उन्हाळ्यात कारच्या आतले तापमान जास्त जाऊ शकते. म्हणून उष्ण वातावरणात टिकणारा डॅशकॅम निवडणे महत्त्वाचे आहे.
१२) तारीख व वेळ (Date & Time Stamp) : व्हिडिओवर तारीख, वेळ, योग्यरीत्या नोंदली जाणे आवश्यक आहे. पुराव्याच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा असतो.
मी दोन गोष्टी टाळायला सांगेन • फक्त कमी किंमत पाहून खरेदी करू नका. • फक्त "4K" लिहिले आहे म्हणूनच तो सर्वोत्तम आहे असे समजू नका. सेन्सरची गुणवत्ता, रात्रीची कामगिरी आणि विश्वासार्हता यांनाही तितकेच महत्त्व आहे.
डॉ. डीडी क्लास : "डॅशकॅम हा खर्च नाही; तो तुमच्या वाहनासाठीचा 'डिजिटल साक्षीदार' आहे. पण तो विश्वासार्ह ठरण्यासाठी त्यात चांगली व्हिडिओ गुणवत्ता, G-Sensor, Loop Recording, Parking Mode आणि दर्जेदार मेमरी कार्ड यांसारखी मूलभूत वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे." "जसा आपण संगणकासाठी CCTV, अँटीव्हायरस किंवा बॅकअप ठेवतो, तसाच डॅशकॅम हा वाहनासाठी 'डिजिटल पुरावा' तयार करणारा सुरक्षा उपाय आहे. तो अपघात घडू नये याची हमी देत नाही; पण अपघातानंतर सत्य समोर आणण्याची शक्यता नक्कीच वाढवतो." "डॅशकॅम हा अनेक प्रसंगी सत्य समोर आणणारा महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा ठरू शकतो. त्यामुळे खोटे आरोप, अनावश्यक वाद आणि काही प्रकारच्या फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण करण्यास मोठी मदत होऊ शकते." शिवाय काही सायबर फ्रॉड मधेही याचा लाभ पुरावा म्हणून होऊ शकतो. म्हणून डॅशकॅम कारमध्ये हवाच !
ⓒ डॉ. धनंजय देशपांडे (dd)
- Cyber Security Consultant
- 3 Times National Award winner
- 3 Times State Award winner
- HOD : Cyber Awareness Foundation, Maharashtra State
- ( अतिथी स्तंभ लेखक- अमृत महाराष्ट्र )
• सायबर सुरक्षा-लेख क्र. १ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
सीबीआयच्या नावाखाली होतोय घाबरवणारा सायबर फ्रॉड-
https://amrutmaharashtra.org/news.php?id=2007
• सायबर सुरक्षा-लेख क्र. २ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा-
सायबर क्राईमच्या राजधानीवर छापा- पकड्लेल्यामध्ये शेकडो भारतीय तरुण गुन्हेगारी विश्वात खळबळ-
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment