अमृतच्या माध्यमातून लक्ष्यित गटातील युवक-युवतींसाठी 'AMRUT DRONE MISSION' अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमाचे प्रशिक्षण १४ जुलै रोजी पुणे, अमरावती, नागपूर व परभणी, तर २१ जुलै रोजी रायगड व नाशिक येथे होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ड्रोन तंत्रज्ञानाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. शेती, सर्वेक्षण, सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, चित्रिकरण, औद्योगिक कामे अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून प्रशिक्षित ड्रोन पायलटची मागणीही दिवसेंदिवस वाढत आहे. हीच संधी युवकांपर्यंत पोहोचावी, त्यांना आधुनिक कौशल्य मिळावे आणि रोजगारासोबत स्व-रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत 'AMRUT DRONE MISSION' हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
अमृत ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध कौशल्य विकास, रोजगार आणि स्व-रोजगाराच्या योजना राबविते. या संस्थेच्या लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी आणि भूमिहार या जातींचा समावेश आहे. या जातींमधील वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्तींना अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.
'AMRUT DRONE MISSION' अंतर्गत अत्याधुनिक ड्रोन पायलट प्रशिक्षण, अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष ड्रोन उड्डाणाचा सराव, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र तसेच रोजगार आणि स्व-रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. भविष्यात ड्रोन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याने युवक-युवतींनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. जुलै महिन्यात राज्यातील सहा ठिकाणी ड्रोन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ जुलै रोजी पुणे, अमरावती, नागपूर आणि परभणी येथे प्रशिक्षण होणार असून २१ जुलै रोजी रायगड आणि नाशिक येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. इच्छुकांनी आपल्या सोयीच्या केंद्रावर प्रवेश घेऊन या संधीचा लाभ घ्यावा. ड्रोन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी www.amrutdronemission.com या संकेतस्थळाला भेट देऊन अधिक माहिती घ्यावी आणि तात्काळ नोंदणी करावी. प्रवेश मर्यादित असल्यामुळे इच्छुकांनी वेळ न दवडता अर्ज करावा. अधिक माहितीसाठी संपर्क : अक्षय चंद्रकांत लंबे जिल्हा व्यवस्थापक, अमृत, छत्रपती संभाजीनगर मो. ७३९१०६५४७५ योगेश भास्करराव रोडे जिल्हा उपव्यवस्थापक, अमृत मो. ९४०३२००६०६ कार्यालयाचा पत्ता : विभागीय व जिल्हा कार्यालय – अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमाननगर, पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment