अमृत व एमसीईडीच्या संयुक्त विद्यमाने अकोल्यात मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षणास उत्साहात प्रारंभ
अकोला : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने अकोला येथील सिंधी कॅम्प येथे आयोजित मोफत ब्युटी पार्लर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक हरिश अलिमचंदाणी होते. प्रमुख उपस्थितीमध्ये सिंधी जनरल पंचायतचे महासचिव कन्हैया आहुजा, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी, अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी तसेच जिल्हा उपव्यवस्थापक गणेश मुळे यांचा समावेश होता. यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
सदर प्रशिक्षणामध्ये २८ महिलांनी सहभाग नोंदविला असून, त्यांना आधुनिक ब्युटी पार्लर व्यवसायासाठी आवश्यक असलेले व्यावसायिक कौशल्य, तांत्रिक ज्ञान व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
यावेळी अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुलकर्णी यांनी अमृत संस्थेमार्फत खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास, स्वयंरोजगार व उद्योजकता विकास योजनांची सविस्तर माहिती दिली. उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनीही अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे कौशल्य विकास व स्वयंरोजगार उपक्रम समाजासाठी अत्यंत उपयुक्त असून, अशा प्रशिक्षणांमुळे महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असल्याचे मत व्यक्त केले. तसेच भविष्यात अधिकाधिक महिलांनी अशा प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व समन्वय रिद्धी दूर्गिया आणि करिश्मा बोधानी यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. कार्यक्रमाचे आयोजन सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडले असून प्रशिक्षणार्थींमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment