अमृत संस्थेच्या नाशिक जिल्हा कार्यालयाला लाभार्थ्यांची भेट
नाशिक : अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या लक्ष्यित गटातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना जीसीसी-टीबीसी योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांनी अमृत संस्थेच्या नाशिक जिल्हा कार्यालयाला भेट दिली. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (जीसीसी-टीबीसी) आणि ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या लाभार्थ्यांनी अमृत संस्थेचे आभार मानले. तसेच त्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या वेळी अमृत संस्थेचे नाशिक विभागीय व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, तसेच जिल्हा व्यवस्थापक संजय गोसावी यांच्यासह अमृतमित्र उपस्थित होते.
योजना नेमकी काय आहे?
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) आणि ऑनलाइन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकांतील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगारक्षम आणि रोजगारक्षम बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलाही स्वतंत्र शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील ‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती (वयोगट १६ ते ४५ वर्षे) या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
त्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाइन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अर्ज केल्यानंतर फीचे साडेसहा हजार रुपये संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केले जातात.
‘अमृत’च्या लक्ष्यित गटातील जाती : ब्राह्मण, मारवाडी, सिंधी, बनिया, राजपुरोहित, कम्मा, कायस्थ, ऐयागर, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, कानबी, राजपूत, कोमटी, इत्यादी.
आवश्यक कागदपत्रे : आधार कार्ड, अधिवास (डोमिसाइल) प्रमाणपत्र (वय, राष्ट्रीय आणि रहिवास प्रमाणपत्र), अमृत लक्ष्यित गटातील जातीचा उल्लेख असलेला शासकीय पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र किंवा आर्थिक दुर्बल घटक प्रमाणपत्र, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र, राष्ट्रीय बँक पासबुक किंवा पोस्ट खात्याचे आयएफएससी कोडसह तपशील.
तुम्हालाही घ्यायचा आहे का ‘अमृत’च्या या किंवा अन्य कोणत्याही योजनांचा लाभ?
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment