गोरेगाव ईस्ट येथील सन्मित्र मंडळ संचालित नूतन शिशु मंदिर दर शनिवारी आपण तेथे अमृत वर्ग घेण्याचे नियोजन केले आहे.
संस्कारक्षम वयामध्ये मुलांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि चांगले संस्कार रुजविण्याच्या हेतूने शहरी आणि ग्रामीण भागातून अमृत वर्गाचे आयोजन करण्यात येते. अमृत संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या या अमृत वर्गात विविध खेळ, प्रेरणादायी उपक्रम आणि आनंददायी कृतींमधून मुलांवर विविध माध्यमांतून संस्कार केले जातात. यामध्ये घेण्यात येणाऱ्या सोप्या आणि रंजक खेळांमध्ये मुले उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. मुले या अमृतवर्गाचा मनापासून आनंद घेतात आणि नव्या ऊर्जा व प्रेरणेसह घरी परततात. "संस्कार, देशभक्ती आणि आनंदाचा संगम म्हणजे अमृतवर्ग!"
अमृत संस्थेच्या माध्यमातून अमृत वर्ग हा उपक्रम आपण देशाचे भविष्य घडवून आणण्यासाठी करीत आहोत. या वर्गामुळे किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक व मानसिक सकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर या मुलांना देशाविषयी प्रेरक गीते व देशभक्तीच्या गोष्टी सांगितल्यामुळे ही मुले भविष्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल पुढे टाकतात. या ताणतणावाच्या वातावरणातून तणावमुक्त व मोबाईल विरहित कसे राहता येईल, यासाठी हा उपक्रम वरदान ठरत आहे. तेव्हा आपल्याही शाळेत किंवा परिसरात अमृत वर्गाचे आयोजन करायचे असल्यास अमृतच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment