सोयगाव येथे ‘अमृत कुटुंब संवाद’ उपक्रम उत्साहात पार पडला आहे.
सोयगाव येथे ‘अमृत कुटुंब संवाद’ उपक्रम उत्साहात सोयगाव, दि. २ : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या वतीने ‘अमृत कुटुंब संवाद – संवाद आणि सुदृढ कुटुंबासाठी एक पाऊल’ या उपक्रमांतर्गत सोयगाव तालुक्यातील श्री. शांताराम दत्तात्रय जोशी यांच्या निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कुटुंबातील संवाद वाढविणे, भारतीय संस्कार व मूल्यांचे जतन करणे, पिढ्यांमधील नाते अधिक दृढ करणे तसेच सुसंस्कृत, सुदृढ आणि आनंदी कुटुंब घडविण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी आजी-आजोबा संवाद कट्टा, एकत्र कुटुंब प्रार्थना, वाचन संस्कृती, मोबाईलमुक्त कुटुंब, कुटुंबीय खेळ, आरोग्य व योग, समाजसेवा आणि कौशल्य विकास अशा विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. हा उपक्रम अमृतचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असून राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सामंत आणि विभागीय उपव्यवस्थापक ओमकार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे व जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी ‘सुसंस्कृत कुटुंब – समृद्ध समाज – सक्षम राष्ट्र’ हा संदेश देत कुटुंबामध्ये संवाद आणि संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment