छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या रोपळेकर चौक शाखेत अमृत संस्थेच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी बैठक घेण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : देवगिरी नागरी सहकारी बँक, रोपळेकर चौक शाखेत अमृत संस्थेच्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती देण्यासाठी एक बैठक घेण्यात आली. या बैठकीचे आयोजन शाखाधिकारी संजीवनी शेजुळ मॅडम यांनी केले. यावेळी देवगिरी बँकेचे क्लस्टर हेड नितीन देशपांडे तसेच बँकेचे अधिकारी सुनील देशमुख उपस्थित होते. बैठकीत अमृत संस्थेमार्फत विद्यार्थी, युवक, महिला, शेतकरी आणि उद्योजकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम आणि उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पुढील काळात अमृतच्या लाभार्थी मंच बैठकीत देवगिरी बँकेच्या वतीने व्यावसायिक कर्ज कसे मिळवायचे, कर्ज मंजुरीची प्रक्रिया काय असते आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अमृत उद्योजकता विकास कौशल्य कार्यक्रम अंतर्गत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या युवक-युवती आणि उद्योजकांना बँकेशी कसे जोडायचे, व्यवसायासाठी कर्ज कसे मिळवायचे आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन कसे करायचे, यासाठी देवगिरी बँक अमृतसोबत काम करणार आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment