पुलगाव शहरात अमृत संस्थेच्या विविध योजनांबाबत आयोजित जनजागृती बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैठकीसोबत घरभेटी, मान्यवरांच्या सदिच्छा भेटी आणि प्रशिक्षणाबाबत नागरिकांनी दाखविलेल्या उत्साहामुळे अमृतच्या योजनांचा प्रचार अधिक प्रभावी ठरला.
पुलगाव शहरात अमृत संस्थेच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी आयोजित बैठकीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैठकीमध्ये शैक्षणिक योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, व्यवसाय कर्ज, विविध प्रशिक्षण कार्यक्रम, अमृत वर्ग, अमृत संवाद सेतू तसेच इतर योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित नागरिकांच्या शंकांचे निरसन करून योजनांचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पावसामुळे काही नागरिक बैठकीला उपस्थित राहू न शकल्याने त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या. भेट घेऊन त्यांना अमृतच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. अनेक शिक्षकांनी सुद्धा आपल्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांपर्यंत अमृतची माहिती पोहोचविण्यास सकारात्मक सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. इच्छुक लाभार्थ्यांचे संपर्क काहींनी उपलब्ध करून दिले तसेच मंदिर परिसरात जनजागृतीसाठी अमृतचे स्टिकर लावण्यास सहमती दर्शविली. बैठकीदरम्यान एका युवकाने ड्रोन प्रशिक्षणासाठी नाव नोंदविण्याची तयारी दर्शविली, तर एका नागरिकाने किमान दहा महिलांना बेकरी व ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी सहभागी करून देण्याचे आश्वासन दिले. भविष्यात पुलगाव येथे अमृतपेठ आयोजित झाल्यास स्टॉल उभारण्याची तयारीही व्यक्त करण्यात आली. एकूणच बैठका, घरभेटी आणि प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून पुलगावमध्ये अमृतच्या योजनांबाबत प्रभावी जनजागृती करण्यात आली असून नागरिकांकडून मिळालेला सकारात्मक प्रतिसाद आगामी उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क : ऋषिकेश खराटे (जिल्हा व्यवस्थापक, वर्धा) – ९११२२२७६३२ पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा – ४४२००१
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment