महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था 'अमृत'च्या 'अमृत कुटुंब संवाद' उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील तांबोळी कुटुंबाशी मनमोकळा संवाद साधण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर :- महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अमृत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'अमृत कुटुंब संवाद' या उपक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर येथील तांबोळी कुटुंबाला भेट देऊन जवळपास दोन तास मनमोकळ्या गप्पा मारण्यात आल्या. हा उपक्रम राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, मराठवाडा विभाग प्रमुख अमित सामंत आणि विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी घेतला. या भेटीत भास्करराव शंकरराव तांबोळी, सौ. मंगला भास्करराव तांबोळी, शशांकराव भास्करराव तांबोळी, सौ. शीतल शशांकराव तांबोळी, शिवांश शशांकराव तांबोळी आणि शिवेंद्र शशांकराव तांबोळी यांच्या सोबत संवाद साधण्यात आला. आजी-आजोबांशी गप्पा, एकत्र प्रार्थना, घरात एकत्र बसून वाचन, भारतीय सण-उत्सव, मोबाईलचा कमी वापर, योग, मुलांवर चांगले संस्कार, कुटुंबातील प्रेम आणि 'माझे कुटुंब – माझा अभिमान' अशा अनेक विषयांवर सगळ्यांनी मनमोकळेपणाने चर्चा केली. या भेटीतील सगळ्यात खास गोष्ट म्हणजे तांबोळी कुटुंबाने आपल्या घराण्याचा चार पिढ्यांचा (ट्री डायग्राम) तयार केला आहे. त्यामध्ये आतापर्यंत सुमारे १२० सदस्यांची नावे आहेत आणि नवीन सदस्यांची नावेही त्यात टाकली जात आहेत. आजच्या काळात अनेकांना आपल्या आजोबा-पणजोबांबद्दलही पूर्ण माहिती नसते. अशा वेळी चार पिढ्यांचा इतिहास जपणारे हे कुटुंब खरंच कौतुकास्पद आहे. या गप्पांमधून घरात रोज थोडावेळ सगळ्यांनी एकत्र बसावे, एकमेकांशी बोलावे, ज्येष्ठांचा मान ठेवावा, मुलांना चांगले संस्कार द्यावेत आणि मोबाईलपेक्षा घरच्यांना वेळ द्यावा, असा चांगला संदेश देण्यात आला. तांबोळी कुटुंबातील सदस्यांनी सांगितले, "असा कुटुंब संवादाचा उपक्रम आम्ही पहिल्यांदाच पाहिला. सगळ्यांना आपले मत सांगण्याची संधी मिळाली. खूप छान वाटले." या उपक्रमासाठी विजयाताई कुलकर्णी आणि विनया कुलकर्णी यांनी सहकार्य केले.
सध्याच्या सोशल मिडीया आणि आभासी विश्वात खरी नाती, आपले कुटुंब या संकल्पना मागे पडत आहेत. कुटुंबाची ही वीण उसवू नये,कौटुंबिक वातावरण व सौहार्द टिकून राहावा म्हणून अमृतने 'कुटुंब संवादाचा' हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. राज्यभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment