अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षणास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित या प्रशिक्षणात एकूण १७ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
परभणी, दि. २७ : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या ड्रोन पायलट प्रशिक्षणास लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित या प्रशिक्षणात एकूण १७ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढावा, ड्रोन तंत्रज्ञानाचे कौशल्य आत्मसात करून युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणादरम्यान सहभागी लाभार्थ्यांना ड्रोनची रचना, सुरक्षित उड्डाणाचे नियम, ड्रोन हाताळणी, कृषी फवारणी, प्रत्यक्ष उड्डाणाचा सराव तसेच संबंधित तांत्रिक बाबींचे अनुभवी प्रशिक्षकांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. या प्रशिक्षणामुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास मदत होणार असून, प्रशिक्षित ड्रोन पायलटच्या माध्यमातून कृषी सेवा क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील. सहभागी लाभार्थ्यांनीही प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त करत अशा कौशल्याधारित प्रशिक्षणांमुळे रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या होत असल्याची भावना व्यक्त केली. हे दहा दिवसीय प्रशिक्षण असून जास्तीत जास्त युवक व युवतींनी अर्ज करावा असे आवाहन परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे यांनी केले आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्षीत गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी,गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. अमृत परभणी जिल्हा कार्यालय, जुनी प्रशासकीय इमारत, पहिला मजला, बीएसएनएल ऑफिसच्या बाजूला, परभणी. मोबाइल : 7391065473
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment