अमृतच्या वतीने उद्योजक होण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) आयोजित करण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवती व लाभार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
EDP प्रशिक्षणाच्या माध्यमातून सहभागी प्रशिक्षणार्थींना व्यवसाय सुरू करण्यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या नागरिकांना व्यवसाय नियोजन, भांडवल उभारणी, शासकीय योजना व अनुदाने, कर्ज सुविधा, मार्केटिंग, व्यवस्थापन कौशल्य तसेच प्रत्यक्ष उद्योगसंधी याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन दिले जाणार आहे. लघुउद्योग, सेवा उद्योग, कृषिपूरक व्यवसाय, ट्रेडिंग तसेच स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.
अमृत कौशल्य उद्यम वर्धन – लघु उद्योग प्रशिक्षण अंतर्गत उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, योग्य कच्चा माल उपलब्धता, तयार मालाची विक्री, बाजारपेठ शोध, ब्रँडिंग व ट्रेडमार्क, नफा–तोटा मोजणी, आर्थिक नियोजन, उद्योगासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच अमृत पेठ या डिजिटल माध्यमातून विक्री कशी करावी, याची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. आवश्यक असलेले उद्योजकता कौशल्य, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, बाजारपेठेची माहिती, डिजिटल साधनांचा वापर तसेच उद्योग क्षेत्रातील विविध संधींबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या, नवीन उद्योग उभारण्याचा विचार करणाऱ्या तसेच विद्यमान व्यवसायाला अधिक सक्षम करण्यासाठी इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायाच्या संधी, आवश्यक नियोजन व पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याच्या दिशेने पुढे यावे, असे आवाहन अमृत जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
संपर्क :विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर -४ सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर .पिन कोड :४३१००९
संपर्क क्रमांक : 7391065475 / 9403200606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment