व्यवसायाला मिळाला मोठा आधार
सोलापूर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या व्याजपरतावा योजनेचा मोठा लाभ सोलापूर जिल्ह्यातील तरुणांना मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण १३ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात व्याजाची रक्कम थेट जमा करण्यात आली असून, यामुळे नवउद्योजकांना आर्थिक बळ मिळाले आहे.
काय आहे ही योजना?
खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुण-तरुणींना स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने अमृत संस्थेमार्फत ही योजना राबवली जाते. यामध्ये लाभार्थ्यांनी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांवरील व्याजाचा हिस्सा शासन उचलते. ज्या लाभार्थ्यांनी नियमितपणे बँकेचे हप्ते भरले आहेत, अशा सोलापुरातील १३ जणांच्या खात्यात आता व्याजाचा परतावा पाठवण्यात आला आहे.
सोलापूर जिल्हा समन्वयक कार्यालयाने केलेल्या पाठपुराव्यामुळे आणि लाभार्थ्यांच्या कागदपत्रांच्या अचूक पडताळणीमुळे ही प्रक्रिया यशस्वी झाली आहे. या योजनेमुळे लघुउद्योजकांवरील व्याजाचा भार कमी होऊन त्यांना आपला व्यवसाय विस्तारण्यास मदत होणार आहे. या योजनेची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्याने यामध्ये पारदर्शकता आली आहे. लाभार्थ्यांनी नियमित हप्ते भरल्यास, व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात आपोआप जमा होते.
'शासनाच्या या मदतीमुळे आम्हाला व्यवसाय करताना मोठा आधार मिळाला आहे. वेळेवर व्याजपरतावा मिळाल्याने बँकांचे हप्ते भरणे सुलभ झाले आहे,' अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया लाभार्थ्यांकडून व्यक्त झाली.
अमृत संस्थेचे सोलापूर जिल्हा व्यवस्थापक श्रेयस कुलकर्णी, उपव्यवस्थापक बिरुदेव वाघमोडे यांनी सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले.
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment