ऑनलाईन अर्जाची तारीख २९ जूनपर्यंत वाढवली आहे.
छत्रपती सांभाजीनगर :- आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव, नैराश्य आणि भावनिक अडचणी वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. हीच गरज लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत मानसमित्र’ समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे ही संस्था तांत्रिक व शैक्षणिक सहकार्य करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शाळा व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या समुपदेशनाची व्यवस्था आवश्यक करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने मानसिक आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा कौशल्याधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या प्रशिक्षणामध्ये मानसिक आरोग्य, विद्यार्थी समुपदेशन, भावनिक आधार, संवाद कौशल्ये, ॲक्टिव्ह लिसनिंग, संकट व्यवस्थापन तसेच जीवनकौशल्ये याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. पुणे येथे प्रथम १५ दिवसांचे प्रत्यक्ष (ऑफलाइन) प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर जिल्हास्तरीय शाळा व महाविद्यालयांमध्ये एक महिन्याचा प्रात्यक्षिक फील्ड एक्सपोजर दिला जाणार आहे. पुढील तीन ते पाच महिने MIMH च्या तज्ज्ञांकडून ऑनलाईन मार्गदर्शन, मेंटरिंग व मॉनिटरिंग करण्यात येणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत व MIMH यांचे संयुक्त अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींसाठी तज्ज्ञांचे सातत्याने मार्गदर्शन व ‘हँड-होल्डिंग सपोर्ट’ देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (MSW) ही पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. संबंधित क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असणार आहे. मात्र प्रशिक्षणादरम्यान राहण्याची, भोजनाची व निवासाची व्यवस्था उमेदवारांना स्वतःच्या खर्चाने करावी लागणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २९ जून २०२६ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. अर्जांची छाननी, ओरिएंटेशन सत्र व मुलाखतीनंतर ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात समाजसेवा करत उज्ज्वल करिअर घडविण्याची इच्छा असलेल्या युवक-युवतींसाठी ही एक उत्तम संधी असून जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत व महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती व संपर्क : विभागीय व जिल्हा कार्यालय, अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४, सिडको, हनुमान नगर पाण्याच्या टाकीजवळ, छत्रपती संभाजीनगर – ४३१००९. 7391065475 / 94032 00606
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. mahaamrut.org.in
Comments 1 Comments
Mrs.Shailaja jagdish kulkarni
मला वर्गात सामील करायच आहे अमृत योजना च्य मध्यातुन- मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअर करण्यासाठी इंग्रजी संभाषण (English Speaking) आणि संवाद कौशल्ये सुधारणे हा एक उत्तम निर्णय आहे. या क्षेत्रात काम करताना रुग्णांशी, डॉक्टरांशी आणि इतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यासाठी इंग्रजी येणे खूप फायदेशीर ठरते
i reday to join to Class
Write a Comment