कणकवलीत ब्राह्मण मंडळाच्या स्नेहसंमेलनात झाली चर्चा
कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : अमृत संस्थेच्या योजना महिला, युवकांसह अनेक समाजघटकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास पाठबळ देणाऱ्या असल्याची प्रातिनिधिक भावना कणकवलीत झालेल्या महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या तालुकास्तरीय वार्षिक स्नेहसंमेलनात व्यक्त झाली. आर्यादुर्गा भवनात झालेल्या या स्नेहसंमेलनात अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांनी संस्थेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेली महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था आहे.
स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी माधव मराठे होते, तर चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील मंदार ओक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण समाजाचा समावेश होतो. त्यामुळे या संमेलनात विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यासाठी अमृत संस्थेला खास वेळ देण्यात आला होता. अमृत संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांनी या वेळी संस्थेच्या कार्याची, विविध उपक्रमांची ओळख करून दिली आणि संस्थेच्या योजनांबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण, संशोधन, उद्योजकता विकास आणि सामाजिक उन्नती अशा विविध विषयांशी संबंधित योजना संस्थेतर्फे राबवल्या जात असल्याचे केळकर यांनी सांगितले. नागरिकांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. युवक, महिला व समाजातील विविध घटकांबद्दलच्या योजनांबद्दल उपस्थितांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून आली.
या कार्यक्रमामुळे कणकवली तालुक्यात अमृत संस्थेच्या योजनांबाबत जनजागृती होऊन आगामी काळात संस्थेचे लाभार्थी वाढण्यास निश्चितच मदत होणार आहे. या स्नेहसंमेलनाला सुमारे १५० जण उपस्थित होते.
अधिक माहितीसाठी संपर्क :
85540 59044
91122 28760
अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.
अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment