देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या सूतगिरणी चौक शाखेचे व्यवस्थापक प्रशांत जोशी यांची अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयास भेट.
देवगिरी नागरी सहकारी बँक, सूतगिरणी चौक शाखेचे व्यवस्थापक प्रशांत जोशी यांनी अमृत स्वायत्त संस्थेच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे यांनी त्यांना ‘पंच परिवर्तन’ हे पुस्तक भेट देऊन स्वागत केले.
यानंतर अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. रोजगारक्षम कौशल्य विकास, औद्योगिक व उन्नत कौशल्य विकास, व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक अर्थसहाय्य, उद्योजकांसाठीच्या योजना, स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अर्थसहाय्य, अमृतपेठ थेट बाजारपेठ, अमृत पर्यटन तसेच अमृत वर्ग या उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
अमृतच्या माध्यमातून युवक, महिला, विद्यार्थी आणि उद्योजकांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम समाजोपयोगी असून अधिकाधिक नागरिकांपर्यंत त्यांची माहिती पोहोचणे आवश्यक असल्याचे मत प्रशांत जोशी यांनी व्यक्त केले.
तसेच आगामी काळात देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून अमृतच्या लक्षित गटातील नागरिकांसाठी विशेष माहितीपर बैठक आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या भेटीदरम्यान अमृतच्या विविध योजनांची माहितीपत्रके देण्यात आली तसेच भविष्यातील परस्पर सहकार्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावेत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment