कन्नडच्या तहसीलदार सारिका भगत यांच्याकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन
कन्नड (छत्रपती संभाजीनगर) : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी कन्नडच्या तहसीलदार सारिका भगत यांची भेट घेतली. अमृत संस्थेच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि लक्ष्यित गटातील लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या वेळी चर्चा करण्यात आली.
अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटातील लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांसाठी लागणारी कागदपत्रे, दाखले व अन्य आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्याची विनंती या वेळी करण्यात आली. लाभार्थ्यांना कागदपत्रे मिळवताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन आणि अमृत यांच्यात समन्वय ठेवून काम करण्यावर भर देण्यात आला. तहसीलदार सारिका भगत यांनी प्रशासनाकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. लाभार्थ्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment