सावरकरांच्या विचारांना देण्यात आला उजाळा
बीड : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या बीड जिल्हा कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. या वेळी सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष व नगरसेवक जगदीश गुरखुदे, नगरसेवक सागर देशपांडे, परशुराम संस्कार संघाचे संस्थापक गजानन जोशी, बाळासाहेब थिगळे, चाणक्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रमोद पुसरेकर, भगवान परशुराम जयंती उत्सव समितीचे संस्थापक अॅड. अक्षय भालेराव, अनुलोमचे उपविभाग जनसेवक किशोर काकडे, रोहित कुलकर्णी, आकाश जवकर, कैवल्य गोरकर यांच्यासह अमृत संस्थेचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी उपस्थित होते.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांची राष्ट्रभक्ती, त्याग आणि सामाजिक विचारांचा आदर्श घेऊन युवकांनी समाज व राष्ट्रहितासाठी कार्य करावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारक, राष्ट्रवादी विचारवंत, साहित्यिक आणि समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. देशभक्ती, सामाजिक समता आणि हिंदुत्वाचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये कठोर शिक्षा भोगूनही त्यांनी राष्ट्रसेवेचा मार्ग सोडला नाही. त्यांच्या विचारांनी अनेक तरुणांना राष्ट्रकार्याची प्रेरणा दिली. त्यांच्या विचारांना या कार्यक्रमात उजाळा देण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment