जून महिन्यात होणाऱ्या १० दिवसांच्या कार्यक्रमासाठी नावनोंदणी सुरू
नांदेड : ज्यांना स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे किंवा आपल्या सुरू असलेल्या व्यवसायाची वृद्धी करायची आहे, असे नागरिक आणि तरुणांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या नांदेड जिल्हा कार्यालयातर्फे जून महिन्यात अमृत उद्योग कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या या निःशुल्क विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश नवीन उद्योजक घडवणे आणि स्थानिक व्यवसायांना चालना देणे हा आहे.
प्रशिक्षणाचे स्वरूप
हा प्रशिक्षण कार्यक्रम एकूण १० दिवसांचा असेल. यामध्ये प्रशिक्षणार्थ्यांची सोय लक्षात घेऊन डिजिटल आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही माध्यमांचा वापर केला जाणार आहे. सहा दिवस ऑनलाइन प्रशिक्षण, तर चार दिवस ऑफलाइन प्रशिक्षण असेल. ऑफलाइन प्रशिक्षण अमृत संस्थेच्या नांदेड कार्यालयात होईल.
पात्रता
- अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
- हे प्रशिक्षण प्रामुख्याने सिंधी, मारवाडी, राजपुरोहित, ब्राह्मण, काम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, ठाकूर, त्यागी, सेन्गुंथर, भूमिहार, गुजराती, जाट, बनिया, राजपूत, कोमटी, नेपाळी हिंदू, लोहाना, इत्यादी 'अमृत'अंतर्गत समाविष्ट असलेल्या घटकांसाठी आहे.
या प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त इच्छुकांनी आपली नावनोंदणी करावी, असे आवाहन अमृत संस्थेचे नांदेड जिल्हा व्यवस्थापक सौरभ कुलकर्णी आणि टीमतर्फे करण्यात आले आहे.
संपर्क : अमृत कार्यालय, नांदेड - 7391065472
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा २५ जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment