अमृत परिवार सर्वेक्षणावेळी आलेले आगळेवेगळे अनुभव

जळगाव जिल्ह्यातील काही नोंदी

अमृत परिवार सर्वेक्षणावेळी आलेले आगळेवेगळे अनुभव मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या सर्वेक्षणावेळी अमृत संस्थेचे जळगाव जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे यांना आलेले काही निवडक अनुभव....

जळगाव जिल्हा हा सोन्याची काशी अर्थात सोन्याची बाजारपेठ आणि केळीचे आगर म्हणून आशिया खंडात ओळखला जातो. अशा या जळगाव जिल्ह्यात १५ तालुके आहेत. पाचोरा तालुक्यातील चिंचपुरे गावात ७० वर्षांपासून वास्तव्याला असलेल्या सोपान श्रीधर धर्माधिकारी यांची रात्री आठ वाजता भेट घ्यायला गेलो. गावातील शेवटच्या टोकाला असलेले घर शोधत, विचारत पोहोचलो. घराकडे पाहिल्यावर हे घर ब्राह्मण कुटुंबाचे असेल असे वाटत नव्हते. एका बाजूला मातीची भिंत, तीदेखील शेणा-मातीने लिंपलेली आणि दुसऱ्या बाजूला कड्यांनी बांधलेली भिंत, जुने पत्रे अशी घराची अवस्था बघून मला थोडा वेळ काही सुचेनासेच झाले. मी त्या काकांना विचारले, की तुम्ही एवढी वर्षे गावात राहत असूनही तुम्हाला घरकुल का मंजूर झाले नाही? ते म्हणाले, 'माझा मुलगा आज २५ वर्षांचा आहे. माझ्या वडिलांचे आयुष्यदेखील याच गावात गेलेय; पण येथील सरपंच व गावकरी असे सांगतात, की या ब्राह्मणाला काही झाले तरी आम्ही घर मंजूर होऊ देणार नाही.' 

हे सांगताना त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे डोळे पाणवलेले बघून मीदेखील भावुक झालो व त्यांना धीर दिला. त्यांना सांगितले, की 'काका, काळजी करू नका. आता अमृत संस्था आपल्यासोबत असेल.' मग तेथील ग्रामसेवकाचा नंबर घेतला. ग्रामसेवकांशी बोलून येणाऱ्या काळात नक्कीच हे काम अमृत संस्था आणि मी पूर्ण करीन, असा शब्द देऊन त्यांना आश्वस्त केले. पुढील भेटीवेळी वरिष्ठांना घेऊन येईन, असेही सांगितले. त्यांनादेखील हे ऐकून खूप बरे वाटले. आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होईल याचा आनंद मला त्यांच्या पूर्ण परिवाराच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्यांनी मला जेवून जाण्याचा आग्रह केला; मात्र पुढच्या वेळी नक्की, असे सांगून मी त्यांचा निरोप घेतला. हा एक छान अनुभव होता. त्यांच्या घरकुलाच्या कामाचा मी पाठपुरावा करत राहीन आणि या कुटुंबाला घरकुल मंजूर होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, एवढे मात्र नक्की.

पाचोरा तालुक्यातीलच पिंपळगाव हरेश्वर या गावातही गेलो होतो. या ठिकाणी महादेवाचे मोठे मंदिर आहे. या महादेवाच्या मंदिराला लागून गोविंद महाराजांचे समाधीस्थळ असून, त्या ठिकाणी दर आषाढी एकादशीला मोठी यात्रा निघते. असे सांगितले जाते, की गोविंद महाराज हे पांडुरंगाचे मोठे भक्त होते. ते दर आषाढी एकादशीला विठ्ठलदर्शनासाठी पायी पंढरपूरला जात असत आणि बारा वाजता पंढरपूरला पोहोचत असत. नेमके बारा वाजता पंढरपूरचे मंदिर बंद होत असल्याने गोविंद महाराजांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन होत नसे. असे दरवर्षी असे होत असे. तरीही ते दर्शनासाठी दर वर्षी त्याच लगबगीने, न हिरमुसता या ठिकाणी दर्शनाला येत असल्याचे पांडुरंगाने पाहिले. त्या वेळी पांडुरंगाने गोविंद महाराजांना स्वप्नात सांगितले, की 'तू माझ्या दर्शनासाठी यापुढे इकडे येण्याची गरज नाही. मी तुला भेटण्यासाठी तुझ्या ठिकाणी पोहोचत जाईन.' म्हणून या पिंपळगाव हरेश्वरलाही आषाढी एकादशीला बारा वाजता विठ्ठलाचे मंदिर बंद होत असते. प्रत्यक्षात श्री पांडुरंग गोविंद महाराजांना दर्शन व्हावे यासाठी स्वतः येत असतात, अशी आख्यायिका आहे. 

या पिंपळगाव हरेश्वर गावात श्री. वैद्य यांच्या घरी गेलो. ते संपूर्ण कुटुंब नुकतेच बाहेरगावाहून घरी परतले होते. ते त्यांच्या मुलीला सोडून पत्नीला बस स्टॉपवरून आणण्यासाठी टू-व्हीलर गाडी काढत होते. तेवढ्यात त्यांना गाठून परिवार सर्वेक्षणाबद्दल सांगितले. तेव्हा त्यांनी १० मिनिटे थांबायला सांगितले. ते पत्नीला घेऊन आल्यावर मग मला घरात बोलावले. तेव्हा पुन्हा थोडक्यात सर्व माहिती सांगितली. परिवाराची संपूर्ण माहिती, कोण काय करते, मोबाइल नंबर वगैरे माहिती लागेल हे ऐकताच त्या वैद्यताई माझ्यावर ओरडल्या. 'आम्ही काही माहिती तुम्हाला देणार नाही,' असे मला रागात बोलू लागल्या. तेवढ्यात संतोष वैद्य यांनी त्यांना समजावले, की 'अमृत संस्थेविषयी मी ऐकून आहे. ही आपल्या समाजासाठी काम करणारी संस्था आहे. तू शांत राहा.'

लगेच त्या ताई त्यांना ओरडल्या आणि पती-पत्नीचे भांडण सुरु झाले. मग मी त्या दोघांनाही बोललो, की 'प्लीज माझ्यामुळे तुम्ही भांडू नका.' त्या ताईंना यामागचे कारण विचारल्यावर त्यांनी सांगितले, की 'मागील वर्षी असेच कोणीतरी सगळी माहिती व मोबाइल नंबर घेऊन गेलेत आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आमचे दीड लाख रुपये बँकेतून गेले.' 

मग मी त्यांना नंबरशिवायदेखील माहिती भरू शकतो असं सांगितले, तेव्हा त्या ताई शांत झाल्या. मग मी त्यांच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले. तेव्हा त्या मला सॉरी म्हणून त्या पाणी आणण्यासाठी किचनकडे गेल्या. मग मी तेवढ्यात त्या काकांकडून मोबाइल नंबर घेतला आणि थोड्या वेळात कॉल करून नंतर सर्व माहिती घेतली. असा एक आगळावेगळा अनुभवदेखील मला सर्वेक्षणात मिळाला.

(जळगाव जिल्हा व्यवस्थापक, अमृत)


Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 05:44 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 05:44 PM News publication time | Views: 268 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement