जनतेच्या विश्वासाला मिळाली नवी बळकटी

लोकसहभागातून धुळे जिल्ह्यात यशस्वी ठरले अमृत परिवार सर्वेक्षण अभियान

जनतेच्या विश्वासाला मिळाली नवी बळकटी मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे एप्रिल महिन्यात अमृत परिवार सर्वेक्षण करण्यात आले. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या योजना लक्ष्यित गटातील जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, याकरिता हे सर्वेक्षण करण्यात आले होते. धुळे जिल्ह्यातील अनुभव...

अमृत परिवार सर्वेक्षण करताना मला समाजातील अनेक कुटुंबांच्या आयुष्याशी जवळून जोडले जाण्याची संधी मिळाली. प्रत्येक घराची कहाणी वेगळी होती - कुठे संघर्ष, कुठे आशा, तर कुठे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपडणारे पालक दिसले. सर्वेक्षणाच्या माध्यमातून मी जेव्हा घराघरांत पोहोचले, तेव्हा सुरुवातीला काही लोक संकोचाने बोलत होते. त्यांची ऐकण्याची मानसिकता तयार करणे थोडे अवघडच गेले; मात्र अमृत संस्थेचे कार्य आणि उद्देश समजावून सांगितल्यानंतर त्यांनी विश्वासाने आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक माता-भगिनींनी आपल्या समस्या सांगितल्या, तर काही विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत शिक्षणाची मोठी स्वप्ने दिसली. त्या प्रत्येक संवादाने माझ्या मनाला स्पर्श केला. काही महिलांमध्ये व युवकांकडे कौशल्य असूनही त्यांना योग्य तो प्लॅटफॉर्म मिळत नाही, असे दिसले. अशा महिला व युवकवर्गाकरिता अमृत संस्थेतर्फे कौशल्याला विकासाची व प्लॅटफॉर्मची जोड मिळेल असा एक विश्वास मी त्यांना दिला.

अनेक जणांनी असे सांगितले, की सरकार योजना काढते आणि आश्वासने देते; पण प्रत्यक्षात त्याबाबत काहीच अंमलबाजवणी होत नाही. त्या वेळी मी अमृत संस्थेतर्फे झालेल्या सर्व कार्याचा एक आढावा त्यांच्यासमोर सादर केला. लाभार्थी प्रतिक्रियाही त्यांना दाखवल्या. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर जी विश्वासाची नवीन झलक पाहायला मिळाली, ती वेगळीच होती.

काही प्रतिक्रिया अशाही होत्या, की आम्ही व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न घेऊन बँकेत कर्ज घेण्यासाठी जातो; पण समोरून कागदपत्रांची एवढी मोठी यादी येते, की ते जमा करेपर्यंत बराच वेळ आणि पैसा जातो. याबाबत अमृत संस्थेची टीम वेळोवेळी नेमके मार्गदर्शन करून कागदपत्रांचा भार थोडा तरी कमी होण्यासाठी मदत करील, असे मी त्यांना सांगितले.

काही भागात वृद्ध नागरिकांनी शासनाच्या योजनांची माहिती वेळेवर मिळत नसल्याची खंत व्यक्त केली, तर विद्यार्थ्यांनी करिअर मार्गदर्शन व शिष्यवृत्ती योजनांबाबत अधिक मदतीची अपेक्षा मांडली. 'अशा प्रकारे प्रत्यक्ष घरी येऊन विचारपूस करणारी संस्था प्रथमच पाहिली,' अशा भावनाही काही ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केल्या.

या सर्वेक्षणामुळे मला जाणवले, की समाजात अजूनही अनेक कुटुंबांना योग्य मार्गदर्शन, शिक्षण व रोजगाराच्या संधींची गरज आहे. आपल्यासाठी कोणतीही संस्था नाही अशी खंत अनेकांना वाटायची; पण अमृत संस्थेची, योजनांची माहिती दिल्यावर त्यांच्या इच्छाशक्तीला जणू पंखच मिळाले.

अमृतसखी म्हणून हे कार्य करताना मी फक्त माहिती संकलित केली नाही, तर अनेकांच्या आयुष्यात विश्वास, आपुलकी आणि आधार निर्माण करण्याचे काम केले. लोकांच्या चेहऱ्यावर दिसलेला विश्वास आणि त्यांच्या मनातील अपेक्षा मला पुढे अधिक जोमाने समाजसेवा करण्याची प्रेरणा देऊन गेल्या. हा अनुभव माझ्यासाठी केवळ सर्वेक्षण नव्हता, तर समाजाच्या भावना समजून घेण्याचा एक भावनिक प्रवास होता. या सर्वेक्षणामध्ये मला अमृत संस्थेचे धुळे जिल्हा व्यवस्थापक हेमंत पाठक आणि संपूर्ण विभागीय टीमचे मार्गदर्शन वेळोवेळी लाभले, त्याबद्दल सर्व टीमचे आभार मानते.

- वैशाली दिलीप कुलकर्णी 

अमृतसखी, धुळे

Publisher: vaishali kulkarni News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 05:15 PM News publication time | Views: 249 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news
Publisher: vaishali kulkarni News publisher name | Date: 20-05-2026 News publication date | Time: 05:15 PM News publication time | Views: 249 Number of times this news has been viewed | District: Dhule Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement