नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण

सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे बोधचिन्ह

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण मुख्य फोटो
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे झाले अनावरण अतिरिक्त फोटो

मुंबई : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे २०२७मध्ये होणार असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हाचे अनावरण १३ मे २०२६ रोजी झाले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते बोधचिन्हाचे अनावरण झाले.

कुंभमेळ्याच्या बोधचिन्हासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन स्पर्धकांचा या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक पटकावलेल्या पुणे येथील सुमित काटे यांना तीन लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. नोएडा येथील मयांक नायक यांना द्वितीय, तर पंढरपूरच्या पीयूष पिंपळनेरकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. त्याबद्दल त्यांना अनुक्रमे दोन लाख आणि एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्जनशीलता, नावीन्य, ब्रँड सुसंगतता आणि सादरीकरण या निकषांवर आधारित ही निवड करण्यात आली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या या अधिकृत बोधचिन्हामध्ये भारतीय अध्यात्म, श्रद्धा आणि सिंहस्थ परंपरेचे दर्शन घडते. भगवान शंकरांचा त्रिशूळ, पवित्र श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिराची छटा आणि शिवलिंगाच्या स्वरूपात साकारलेली गोदावरी नदी यांचा या बोधचिन्हामध्ये अत्यंत समर्पक आणि कलात्मक वापर करण्यात आला आहे. सांस्कृतिक वारसा, भारतीय परंपरा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश प्रभावीपणे देणारे असे हे बोधचिन्ह आहे.

प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी प्रास्ताविक केले. या वेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, उद्योगमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्यासह विविध आखाड्यांचे साधू, संत उपस्थित होते.


Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 08:47 PM News publication time | Views: 558 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news
Publisher: Aniket Konkar News publisher name | Date: 13-05-2026 News publication date | Time: 08:47 PM News publication time | Views: 558 Number of times this news has been viewed | District: Ratnagiri Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement