इंधनबचतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अनोखा प्रयोग

जळगावच्या कार्यकर्ता विकास वर्गात दैनंदिन खर्च सहा हजारांवरून ३०० रुपयांवर

इंधनबचतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अनोखा प्रयोग मुख्य फोटो
इंधनबचतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अनोखा प्रयोग अतिरिक्त फोटो

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम क्षेत्राच्या कार्यकर्ता विकास वर्गाचे (प्रथम) आयोजन सध्या जळगावमधील खानदेश एज्युकेशन सोसायटीच्या एम. जे. कॉलेज येथे करण्यात आले आहे. ३० मे २०२६पर्यंत एकवीस दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षण वर्गात २५५ स्वयंसेवक शिक्षार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यासोबतच ४० ते ५० कार्यकर्ते विविध व्यवस्थांमध्ये कार्यरत आहेत. अशा जवळपास ७०० ते ८०० जणांच्या रोजच्या भोजनव्यवस्थेचे मोठे आव्हान वर्गासमोर होते; मात्र संघाच्या कार्यपद्धतीप्रमाणे पर्यावरणपूरक, स्वदेशी आणि कमीत कमी खर्चातील पर्याय शोधण्याचा प्रयत्न यंदा विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

देशात इंधन बचतीबाबत सातत्याने चर्चा सुरू असताना आणि पंतप्रधानांनीही इंधन बचतीचे आवाहन केलेले असताना जळगावच्या या वर्गामध्ये त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी पाहायला मिळत आहे. इराण-अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाच्या किमती आणि उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग अधिक महत्त्वाचा मानला जात आहे.

साधारणतः सहाशे जणांच्या स्वयंपाकासाठी दररोज किमान दोन मोठे एलपीजी गॅस सिलिंडर लागतील असा अंदाज होता. प्रत्येक सिलिंडरचा खर्च विचारात घेतला असता प्रति दिवस जवळपास सहा हजार रुपयांचा खर्च अपेक्षित होता. संपूर्ण एकवीस दिवसांच्या वर्गासाठी गॅसचा खर्च तब्बल सव्वा लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता होती; मात्र संघाच्या व्यवस्थापकांनी यावर पर्याय शोधला.

धुळे येथील स्वयंसेवक राहुल कुलकर्णी यांनी विशेष प्रकारची शेगडी तयार करून दिली. या शेगडीत एलपीजीऐवजी नूतनीकरणक्षम ऊर्जास्रोताचा वापर करण्यात आला आहे. कपाशी किंवा तुरीची वाळलेली झाडे (तूरखाटी) व गायीचे शेण मिसळून तयार केलेले ‘वूड ब्लॉक्स’ हे या शेगडीचे मुख्य इंधन आहे. बाजारात प्रत्येकी सुमारे तीन रुपयांना उपलब्ध असलेले हे वूड ब्लॉक्स/ ब्रिक्स १५० ते २०० रुपये प्रति गोणी या दराने सहज उपलब्ध होतात. 

ज्या ठिकाणी दररोज सहा हजार रुपयांचा एलपीजी खर्च अपेक्षित होता, त्याच ठिकाणी आता या प्रयोगामुळे अवघ्या ३०० रुपयांमध्ये स्वयंपाक पूर्ण होत आहे. म्हणजेच दररोज मोठ्या प्रमाणावर इंधन बचत होत असून, खर्चातही लक्षणीय घट झाली आहे. विशेष म्हणजे हा पर्याय केवळ स्वस्त नाही, तर पर्यावरणपूरकही आहे. शेतीमधील उरलेला जैविक कचरा उपयुक्त इंधनामध्ये रूपांतरित होत असल्याने पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागत आहे.

सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी केले विशेष कौतुक

सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे वर्गात तीन दिवस उपस्थित राहिले. वर्गातील सर्व व्यवस्था व उपक्रमांची त्यांनी विस्तृत माहिती घेतली. शेगडीचा प्रयोग त्यांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिला. त्याची माहिती घेतली. त्या वेळी त्यांनी या अभिनव प्रयोगाचे विशेष कौतुक केले. 'असा प्रयोग आपण देशभरात सुरू असलेले संघ शिक्षा वर्ग व अन्य कार्यक्रमातदेखील करू. याविषयी मी स्वतः जळगावच्या प्रयोगाची माहिती सांगीन,' असे ते म्हणाले. 

संघाच्या विविध प्रशिक्षण वर्गांमध्ये शिस्त, नियोजन आणि स्वावलंबन यांना नेहमीच महत्त्व दिले जाते. जामनेर येथील संघ शिक्षा वर्गातसुद्धा याच शेगडीचा वापर सुरू आहे. त्यामुळे जळगाव व जामनेर येथील या प्रयोगामुळे कमी खर्चात प्रभावी व्यवस्थापनाचा एक आदर्श उभा राहिला आहे. ग्रामीण भागात, मोठ्या सामूहिक कार्यक्रमांमध्ये किंवा सामाजिक उपक्रमांमध्येही अशा पर्यायी इंधन व्यवस्थेचा वापर होऊ शकतो. पर्यावरण संरक्षण, इंधन बचत आणि स्वदेशी तंत्रज्ञान यांचा सुंदर संगम घडवणारा हा प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 25-05-2026 News publication date | Time: 11:00 AM News publication time | Views: 11,398 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news
Publisher: Yogesh Joshi News publisher name | Date: 25-05-2026 News publication date | Time: 11:00 AM News publication time | Views: 11,398 Number of times this news has been viewed | District: Washim Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 2 Comments

P
Prasanna Dhoke
01-06-2026 02:00 PM

Excellent work done by RSS in there camps

P
Prasanna Dhoke
01-06-2026 01:59 PM

Excellent work done RSS in there camps

Write a Comment
0 / 50 words
Advertisement