उद्योग क्षेत्राला चालना; तरुणांसाठी रोजगाराच्या निर्माण होणार नव्या संधी
पुणे : जीई एरोस्पेस या जागतिक स्तरावरील प्रसिद्ध विमान इंजिन निर्मिती कंपनीने पुण्यात आणखी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली असून, त्यामुळे पुणे आता विमाननिर्मिती आणि एरोस्पेस उद्योगाच्या जागतिक नकाशावर ठळकपणे झळकणार आहे. या गुंतवणुकीमुळे पुण्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन, संशोधन आणि अभियांत्रिकी क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे. विशेषतः एरोस्पेस आणि एव्हिएशन क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी कंपनीकडून आधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत. यामुळे स्थानिक उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही मोठे बळ मिळणार आहे. या कंपनीची तीन वर्षांमधील पुणे युनिटमधील आतापर्यंतची एकूण गुंतवणूक ५१० कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.
जीई एरोस्पेसच्या या प्रकल्पामुळे पुणे आणि आसपासच्या भागातील हजारो तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. अभियांत्रिकी, उत्पादन, तांत्रिक सेवा, संशोधन, गुणवत्ता नियंत्रण आणि सपोर्ट सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांत कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण होणार असून, स्थानिक युवकांना जागतिक दर्जाच्या उद्योगात काम करण्याची संधी मिळणार आहे.
तज्ज्ञांच्या मते, पुणे शहरात आधीपासूनच वाहन उद्योग, आयटी, ऑटोमेशन आणि अभियांत्रिकी क्षेत्रासाठी सक्षम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यात आता एरोस्पेस क्षेत्राची भर पडल्याने पुण्याची ओळख ‘इंडस्ट्रियल आणि टेक्नॉलॉजी हब’ म्हणून अधिक मजबूत होणार आहे. तसेच स्थानिक लघू व मध्यम उद्योगांनाही या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनानेही या गुंतवणुकीचे स्वागत करताना महाराष्ट्र उद्योगस्नेही राज्य असल्याचे अधोरेखित केले आहे. आधुनिक उद्योग, परदेशी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती यांना प्राधान्य देत राज्य शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.
या महत्त्वपूर्ण प्रकल्पामुळे पुण्याची जागतिक औद्योगिक क्षेत्रातील ओळख अधिक उंचावणार असून, भविष्यात एरोस्पेस आणि विमाननिर्मिती क्षेत्रात पुणे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment