प्रशिक्षणार्थींनी उद्योगांना भेट देऊन घेतले प्रात्यक्षिक ज्ञान

बीड जिल्ह्यातील केजमधील उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमातील लाभार्थ्यांची लातूर एमआयडीसीला औद्योगिक भेट

फोटो उपलब्ध नाहीत

या बातमीशी संबंधित कोणतेही फोटो उपलब्ध नाहीत

केज (ता. केज, जि. बीड) : अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या पुढाकारातून आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या (एमसीईडी) सहकार्याने केज येथे सुरू असलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थींना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरेल अशी औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली होती.

हा उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम २१ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला. त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून कार्यक्रम समारोपाच्या आदल्या दिवशी लातूर एमआयडीसीतील विविध उद्योगांना प्रत्यक्ष भेट देण्यात आली. एकूण ३८ प्रशिक्षणार्थी यात सहभागी झाले होते. सर्व प्रशिक्षणार्थी उत्साहाने यात सहभागी झाले होते. या औद्योगिक भेटीमध्ये प्रशिक्षणार्थींना गाईच्या शेणापासून तयार होणाऱ्या गोवर्‍या, लाकूड (गोकाष्ठ), नारळापासून तयार होणारा काथ्या, पायपुसणी, कोकोपीट व इतर उत्पादने, तसेच गारमेंट उद्योगातील प्रत्यक्ष उत्पादन प्रक्रियेचे सखोल व प्रात्यक्षिक ज्ञान मिळाले.

या भेटीत अमृत बीड जिल्हा उपव्यवस्थापक दिगंबर जोशी, एमसीईडी संस्थेचे बीड प्रकल्प अधिकारी दत्तात्रय क्षीरसागर, एमसीईडीचे लातूर प्रकल्प अधिकारी श्री. गायकवाड, तसेच अमृत संस्थेचे लातूर जिल्हा व्यवस्थापक शुभम मुळजकर उपस्थित होते.

प्रथम गाईच्या शेणापासून गोवर्‍या तयार करणाऱ्या उद्योगाला भेट देण्यात आली. येथे उद्योगपती श्री. चौधरी यांनी कच्चा माल, वापरण्यात येणारी मशिनरी, उत्पादन प्रक्रिया, खर्च रचना, विक्री व बाजारपेठ याबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थींनी विविध प्रश्न विचारून उद्योग उभारणीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली.

यानंतर बंजारा गारमेंट्स या उद्योगास भेट देण्यात आली. येथे श्री. अभिषेक यांनी शर्ट, टी-शर्ट, पॅन्ट आदी वस्तूंच्या निर्मितीची प्रक्रिया, कच्चा माल, कामगार व्यवस्थापन व विक्री यंत्रणा याबाबत प्रत्यक्ष माहिती दिली. उत्पादन प्रक्रिया जवळून पाहण्याची संधी मिळाल्याने प्रशिक्षणार्थ्यांना विशेष आनंद झाला. नारळपाणी काढल्यानंतर उरलेल्या नारळाच्या सर्व भागांपासून काथ्या, पायपुसणी, कोकोपीट व विविध उपयोगी वस्तू कशा तयार केल्या जातात याचे प्रात्यक्षिक तुषार सावंत यांनी दाखवले. कचऱ्यातून मूल्यनिर्मिती ही संकल्पना प्रशिक्षणार्थींना विशेष प्रेरणादायी ठरली.

या संपूर्ण औद्योगिक भेटीमध्ये दिगंबर जोशी यांनी प्रशिक्षणार्थींच्या वतीने उद्योजकांना कच्चा माल उपलब्धता, प्रक्रिया, मशिनरी, खर्च मांडणी व विक्री किंमत निर्धारण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारून सखोल मार्गदर्शन घेतले. यामुळे प्रशिक्षणार्थींचा आत्मविश्वास लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले.

या एकदिवसीय एमआयडीसी औद्योगिक भेटीमुळे प्रशिक्षणार्थींमध्ये स्वतःचा उद्योग सुरू करण्याची प्रेरणा, आत्मविश्वास व कार्योत्साह निर्माण झाला. केजमध्ये सुरू असलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिराला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी समस्त ब्राह्मण संघर्ष समितीचे संस्थापक धनंजय कुलकर्णी (केज), तसेच न्यूज वनचे संपादक रामदास तपसे आवर्जून उपस्थित होते.

Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 22-12-2025 News publication date | Time: 01:14 PM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 22-12-2025 News publication date | Time: 01:14 PM News publication time | Views: 140 Number of times this news has been viewed | District: beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words