चिपळूणमध्ये झाला देवर्षी नारद पुरस्कार वितरण सोहळा
चिपळूण : 'भारतातली कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम या बाबींवर विविध स्तरांवर आव्हानं निर्माण होत आहेत. या संदर्भात समाजात जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे,' असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत अभिजित जोग यांनी व्यक्त केलं. मुंबईच्या विश्व संवाद केंद्रातर्फे चिपळूणमध्ये (जि. रत्नागिरी) आयोजित करण्यात आलेल्या देवर्षी नारद पत्रकार सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्यात रायगड जिल्ह्यातल्या मुरूडमधले पत्रकार मेघराज जाधव, सिंधुदुर्गातले शेखर सामंत, चिपळूणचे समीर जाधव, गुहागरचे मयूरेश पाटणकर आणि गावखडीतले यू-ट्यूबर ऋषभ तोडणकर यांना देवर्षी नारद पत्रकार सन्मान देऊन गौरवण्यात आलं. या वेळी ज्येष्ठ पत्रकार राजेश जोष्टे आणि प्रसाद काथे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभिजित जोग यांनी आपल्या भाषणात जागतिक घडामोडी, समाजमाध्यमांचा प्रभाव आणि विविध विचारप्रवाहांबाबत मतं व्यक्त केली. भारताची विविधतेने नटलेली संस्कृती आणि सामाजिक एकात्मता टिकवण्यासाठी सजग राहण्याचं आवाहन त्यांनी केलं. जोग म्हणाले, 'भारतातली कुटुंबव्यवस्था, धर्मसंस्कार आणि देशप्रेम संपवण्यासाठी जागतिक स्तरावरून डावी विचारसरणी मोठे प्रयत्न करत आहे. या धोक्यांबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे. अमेरिकसह अन्य तीन देशांनी डीप स्टेट ही व्यवस्था निर्माण केली आहे. काही देशांमधली सत्ता उलथवून लावण्यात आली आहे. जगातल्या विविध देशांत सुदृढ लोकशाही यावी असं दाखवून या देशांना आपल्या प्रभावाखाली आणण्याचा प्रयत्न डीप स्टेटच्या माध्यमातून होत आहे. भारतातही हा प्रयत्न सुरू आहे. त्यासोबत सांस्कृतिक मार्क्सिझमचा धोकाही आपल्यासमोर आहे. वैविध्यपूर्ण संस्कृती असलेला भारत देश हिंदुत्वाच्या धाग्यांनी घट्ट जोडला गेला आहे. हे धागे तोडण्यासाठी सामाजिक माध्यमांद्वारे, आपल्याच देशातल्या काही लोकांना पैसा आणि टूलकिट देऊन काम सुरू आहे. यासोबतच मुस्लिम जिहादचा धोका आहे. या सर्व धोक्यांबाबत हिंदू समाजाला जाणीव करून देण्याची गरज आहे.'
प्रसाद काथे यांनी विश्व संवाद केंद्राच्या कार्याची माहिती देऊन पुरस्कार निवड प्रक्रियेविषयी सांगितलं. राजेश जोष्टे यांनी पत्रकारितेतल्या मूल्यांवर भाष्य करून विकासाभिमुख पत्रकारितेची गरज अधोरेखित केली.
या कार्यक्रमाला विश्व संवाद केंद्राचे डॉ. निशीथ भांडारकर, नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे संचालक संदीप खरे, संघाचे विभाग संघचालक दत्ता सोलकर, प्रांत कार्यकर्ते प्रसाद आगवेकर, विभाग सहकार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे, चार्टर्ड अकाउंटंट मंदार लेले, घरडा अभियांत्रिकीमधील प्राध्यापक डॉ. सुदेश आयरे, डॉ. विकास नातू, युनायटेड इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक मुकुंद कानडे, व्यापारी उदय चितळे, 'लोटिस्मा'चे संचालक विनायक ओक, कीर्तनकार शरद तांबे, ज्योतिषी खांडेकर यांच्यासह चिपळूणमधील प्रतिथयश मान्यवर उपस्थित होते.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment